आयएनएक्स मीडिया प्रकरणी काँग्रेस नेते पी.चिदंबरम, त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम व इतर आरोपींना कागदपत्रे दाखवण्यात यावीत याबाबत सीबीआयने दाखल केलेली आव्हान याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळली आहे.

कनिष्ठ न्यायालयाने ही कागदपत्रे दाखवण्याचा आदेश जारी केला होता,त्याला सीबीआयने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सीबीआयने म्हटले होते ,की विशेष न्यायालयाने ५ मार्च रोजी एक आदेश जारी केला असून मलखाना या ठिकाणी ठेवण्यात आलेली कागदपत्रे आरोपींना दाखवण्यात यावीत. तो आदेश रद्दबातल करण्यात यावा अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर  न्यायालयाने सांगितले,की याचिका फेटाळण्यात येत आहे.

सीबीआयने या प्रकरणातील कागदपत्रे दाखवण्यास नकार दिला होता. यात माजी केंद्रीय मंत्री चिदंबरम हे आरोपी असून न्यायप्रविष्ट बाब असल्याने ही कागदपत्रे दाखवता येणार नाहीत असे सीबीआयने म्हटले होते.

उच्च न्यायालयातील याचिकेत सीबीआयने म्हटले होते,की आयएनएक्स मीडिया प्रकरणात भ्रष्टाचार झाला असून त्याचे समाजावर परिणाम झाले आहेत. आरोपींचे काही हक्क असले तरी सामाजिक हित नजरेआड करून चालणार नाही त्यामुळे कागदपत्रे दाखवण्यास परवानगी देण्यात येऊ नये. तसे केल्यास न्याय्य सुनावणी झाली असे म्हणता येणार नाही. सदर कागदपत्रे जरी सीबीआयच्या ताब्यात असली तरी आरोपी व प्रतिवादींना त्याच्या प्रती यापूर्वी देण्यात आल्या होत्या. या प्रकरणात सत्य बाहेर काढण्याचा हेतू असून न्यायालयाने आरोपींना बचावात मदत करू नये. याआधी १८ मे रोजी चिदंबरम व त्यांच्या मुलावरील प्रकरणाच्या कामकाजास  स्थगिती देण्यात आली होती.