हैदराबाद येथील एका व्यापाऱ्याने सीमा शुल्क कायद्याचे उल्लंघन करून आणलेल्या १६ आरामदायी गाडय़ा सीबीआयने ताब्यात घेतल्या. या गाडय़ांची विक्री विविध क्षेत्रांतील मान्यवरांना करण्यात आली होती; तथापि द्रमुक नेते एम. के. स्टॅलिन यांच्या नावावर नोंद असलेल्या एसयूव्ही गाडीचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही.
द्रमुकने केंद्रातील यूपीए सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर सीबीआयच्या पथकाने स्टॅलिन यांच्या निवासस्थानावर ‘हमर’ गाडीचा शोध घेण्यासाठी छापा टाकला. हा गाडय़ा आयातीचा मोठा घोटाळा असल्याचा दावा करून सीबीआयने गुरुवारी १७ गाडय़ा जप्त केल्या.
सीबीआयने शुक्रवारी आणखी १६ गाडय़ा जप्त केल्या, परंतु महसूल गुप्तचर संचालनालयातील अधिकारी मुरुगनंदन यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या दस्तऐवजावरून असे सूचित होत आहे की, व्यापारी अॅलेक्स जोसेफ यांनी कायद्याचे उल्लंघन करून आणखी गाडय़ा घेतल्या आहेत.
या प्रकरणाचा सूत्रधार जोसेफ याला लवकरच अटक करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अटकेच्या भीतीने जोसेफ पसार झाल्याचे कळते.