ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघाताला २ दिवस झाले आहेत. या घटनेत २७५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ११०० हून अधिक जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर ओडिशातील विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. तसेच, रुळावरील अपघातग्रस्त रेल्वेचे डब्बे हटवण्यात आले आहेत. अशातच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठी घोषणा केली आहे. या अपघाताचा तपास सीबीआयाकडे देण्याची शिफारस रेल्वे बोर्डाने केली आहे, अशी माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली आहे. भुवनेश्वर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, "प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार या अपघाताची पुढील चौकशी सीबीआयकडे देण्याची शिफारस रेल्वे बोर्डने केली आहे. मुख्य रुळाच्या दुरूस्तीचं काम पूर्ण झालं आहे. विद्युतीकरणांचं काम अद्यापही सुरु आहे. रेल्वे जखमी आणि मृत प्रवाशांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहे," अशी माहिती वैष्णव यांनी दिली. दरम्यान, दोन दिवसानंतर रेल्वे डब्ब्यात अडकलेले सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आतापर्यंत २७५ जणांचा मृत्यू, तर ११०० हून अधिक जखमी झाले आहेत. रुग्णालयात मृतदेहाचे ढीग लागलेले आहेत. शाळा आणि कोल्ड स्टोरेजमध्येही मृतदेह ठेवण्यात आले आहेत.