नवी दिल्ली : प्रख्यात तबलावादक झाकीर हुसेन, समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायमसिंह यादव (मरणोत्तर), कर्नाटकातील ज्येष्ठ नेते एस. एम. कृष्णा यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर प्रख्यात पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर, सामाजिक कार्यकर्त्यां सुधा मूर्ती, प्रसिद्ध लेखक एस. एल. भैरप्पा, उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यंदा भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराची  घोषणा करण्यात आलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने नागरी पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये सहा जणांना पद्मविभूषण, नऊ जणांना पद्मभूषण तर ९१ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. १९७१च्या युद्धामध्ये जखमी जवानांवर उपचार करण्यासाठी अमेरिकेतील नोकरी सोडून मायदेशी आलेले पश्चिम बंगालमधील डॉ. दिलीप महालबनीस (मरणोत्तर), प्रख्यात स्थापत्यविषारद बाळकृष्ण दोशी (मरणोत्तर) अमेरिकेतील शास्त्रज्ञ श्रीनिवास वर्धन यांनाही पद्मविभूषण या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविण्यात येईल. तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये पुण्याच्या भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतील (आयसर) मानद प्राध्यापक डॉ. दिलीप धर, प्रख्यात शास्त्रीय गायिका वाणी जयराम, तेलंगणातील अध्यात्मिक गुरू स्वामी चिन्ना जियार आणि कमलेश पटेल, दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू कपिल कपूर यांचा समावेश आहे.

दिवंगत गुंतवणूकतज्ज्ञ राकेश झुनझुनवाला, सामाजिक कार्यकर्ते भिकू रामजी इदाते, झाडीपट्टी भाषेतील रंगभूमी कलाकार परशुराम खुणे, सामाजिक कार्यकर्ते गजानन माने, ज्येष्ठ पत्रकार रमेश पतंगे, अभिनेत्री रविना टंडन, लेखक प्रभाकर मांडे, गायिका कूमी वाडिया या विविध क्षेत्रांमध्ये आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या महाराष्ट्रातील व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. अलिकडेच ‘नाटू नाटू’ गाण्यासाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकाविणारे संगीतकार एम. एम. किरावानी यांनाही पद्मश्री पुरस्कारने गौरविण्यात येईल. मार्च किंवा एप्रिल महिन्यात राष्ट्रपती भवनामधील समारंभांमध्ये पद्म पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात येईल.

आजवरच्या माझ्या संशोधनाच्या कामाची दखल पद्मभूषण पुरस्कारासाठी घेतली गेली याचा आनंद आहे. तसेच यापुढील काळातही चांगले काम, संशोधन करत राहण्याचा प्रयत्न करत राहणार आहे.

डॉ. दिलीप धर, मानद प्राध्यापक, आयसर

आपण जे पेरले आहे ते उगवल्याचे शेतकऱ्यांना जसे समाधान मिळते, तसे समाधान हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर वाटत आहे. समाजाचे वाळवंट झालेले नाही. आपण पेरलेले उगवल्याचा विशेष आनंद आहे. निराश व्हायचे कारण नाही. देर आये तो भी दुरुस्त आये. आपण उभ्या केलेल्या कामाची पावती समाज आता देत आहे. सरकारने आपल्या योगदानाची योग्य दखल घेतल्यामुळे चांगले वाटत आहे. धन्यवाद.

डॉ. प्रभाकर मांडे, लेखक

गेल्या पन्नास वर्षांत गरीब, पीडित, वंचित यांच्यासाठी काम केले. केंद्र सरकारच्या समितीवर काम करण्याची संधी मिळाली. भटक्या विमुक्तांसाठी चार योजनांची केंद्र सरकारकडून निर्मिती झाली आहे. त्यामुळे पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे. देशातील पीडित, वंचित घटकांना हा पुरस्कार समर्पित करतो.

भिकू इदाते, सामाजिक कार्यकर्ते

माझ्या जीवनातील हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. ज्या झाडीपट्टीतील रसिकांनी माझ्यावर प्रेम केले त्यांना हा पुरस्कार अर्पित करतो.

परशुराम खुणे, झाडीपट्टी रंगभूमी कलाकार

यंदाच्या पुरस्कारांची वैशिष्टय़े

* सहा पद्मविभूषण, नऊ पद्मभूषण, ९१ पद्मश्री असे १०६ पुरस्कार

*१९ महिलांचा समावेश

* परदेशी, अनिवासी भारतीय प्रकारात दोघांचा सन्मान

* महाराष्ट्रातील ११ जण ‘पद्म’चे मानकरी

* तीन पद्मश्री पुरस्कार  विभागून

* सात जणांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर

* यंदाही ‘भारतरत्न’ पुरस्काराची घोषणा नाही

पंतप्रधानांकडून अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून पद्म पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. ‘गौरविण्यात आलेल्यांचे देशासाठी योगदान आणि प्रयत्न यामुळे भारत विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central government announced padma awards 2023 on republic day zws
First published on: 26-01-2023 at 01:58 IST