पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रमोशनसाठी लवकरच एक नावा नियम लागू केला जाऊ शकतो. या नव्या नियमानुसार पोलीस अधिकारी/कर्मचाऱ्यांना बढती देताना तंदुरूस्तीचा आधार ही घेतला जाईल. पोलिसांना तंदुरूस्त ठेवण्यासाठी केंद्र सरकार हा निर्णय घेण्याचा विचार करत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, गृहमंत्रालयाने म्हटले आहे की, तंदुरूस्तीला प्राधान्य देण्यासाठी संबंधीत विभागांना परिपत्रक पाठवण्यात आले आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रशिक्षण विभागांकडून हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. विविध राज्यातून ३ जुलैपर्यंत यावर त्यांचे मते ही मागवण्यात आले होते.

बढतीसाठी तंदुरूस्ती चाचणीची पद्धत अनेक निमलष्करी दलांमध्ये वापरली जाते. अधिकाऱ्यांचे मानसिक आरोग्य, ऐकण्याची क्षमता, दृष्टी क्षमता, शारीरिक क्षमतांसहित तंदुरूतीच्या अनेक पैलूंचा बढतीवेळी विचार केला जातो. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने २१ जून रोजी याची अधिसूचना जारी केली होती. आयपीएस अधिकाऱ्यांसाठी विविध पदांच्या पदोन्नतीपूर्वी त्यांच्या तंदुरूस्तीचाही विचार करण्यात यावा अशी, शिफारस गृहमंत्रालयाने केली आहे. आयपीएस पे रूल ३ मध्ये हे बदल करण्याचे प्रस्ताव देण्यात आला आहे. नवीन प्रस्ताव हा पोलीस प्रशासनाला तंदुरूस्त ठेवण्यासाठी देण्यात आला आहे.

एक आयपीएस अधिकारी तंदुरूस्त असणे खूप महत्वाचे आहे. प्रत्यक्ष काम करताना तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तो तयार असला पाहिजे, असे मत एका आयपीएस अधिकाऱ्याने व्यक्त केले. पोलीस महानिरीक्षक, महासंचालक आणि आयुक्त रँकच्या बढतीसाठी आयपीएस अधिकाऱ्यांना किमान एक आठवड़याचे प्रशिक्षण देण्यात यावे, असा प्रस्तावही ठेवला आहे.