महाराष्ट्रासह काही राज्यांत करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असताना लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना केंद्राने राज्यांना दिल्या असून अद्याप अनेक आरोग्य व आघाडीच्या कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली नसल्याचे म्हटले आहे.

राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात  केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी म्हटले आहे की, आठवड्यातील लसीकरणाचे दिवस वाढवले पाहिजेत, किमान चार दिवस तरी लसीकरणाचे काम झाले पाहिजे तसेच त्यापुढील टप्प्यात पन्नाशीपुढील व्यक्तींचे लसीकरणही हाती घेण्याची गरज आहे. काही राज्यांनी आठवड्यातून दोन दिवस  लसीकरण सुरू ठेवले असून काही राज्यांत चार दिवस लसीकरणाचे काम केले जात आहे. कोविन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे पत्रात म्हटले आहे. १९  फेब्रुवारीच्या पत्रात म्हटले आहे की, आरोग्य व आघाडीच्या कर्मचाऱ्यांपैकी अनेकांना अजून लस मिळालेली नाही. त्यामुळे यात आठवड्यातील लसीकरणाचे दिवस वाढवण्याची गरज आहे. आतापर्यंत राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या अनेक आढावा बैठका घेण्यात आल्या असून लसीकरण वाढवण्याची गरज त्यातून दिसून आली आहे. वयस्कर लोकांनाही तातडीने लस देणे सुरू करावे लागणार आहे.  मार्च २०२१ पासून सहआजार असलेल्या पन्नाशीवरील लोकांना लस देण्याचे काम सुरू करावे लागेल.

भूषण यांनी म्हटले आहे की, येत्या काही दिवसांत वेगाने लसीकरण केले जाईल अशी अपेक्षा आहे. उपविभागीय रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, आरोग्य उपकेंद्रे यांनी १ मार्चपासून लसीकरणाची आणखी व्यापक व्यवस्था करण्याची गरज आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना तसे आदेश देण्यात यावेत. २१ फेब्रुवारीअखेर ११०८५१७३ लस मात्रा २३०८८८ सत्रात देण्यात आल्या असून त्यात ६३९१५४४ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिली मात्रा दिली आहे तर ९६०६४२ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. आघाडीच्या कर्मचाऱ्यांत ३७३२९८७ जणांना लशीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.

इतर देशांना वाट पाहावी   लागेल – पूनावाला

कोविड १९ प्रतिबंधक लस पुरवण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत, पण इतर देशांना त्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल कारण आम्ही आधी भारताला प्राधान्य देत आहोत, असे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पूनावाला यांनी म्हटले आहे. भारताची गरज भागवत असतानाच जगातील इतर देशांनाही लस पुरवण्याचा आमचा प्रयत्न आहे, किंबहुना देशांतर्गत व परदेशातील पुरवठा यात समतोलही साधला जाईल पण त्याला थोडा वेळ लागेल. आम्ही आमच्या परीने प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहोत.

संयुक्त राष्ट्रांकडून प्रशंसा

संयुक्त राष्ट्रे : भारताने करोना विरोधात दिलेल्या लढ्यातील कामगिरी प्रशंसनीय असून भारताकडून जगालाही लस पुरवठा करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँतोनियो गट्रेस यांनी सांगितले.

भारताचे संयुक्त राष्ट्रातील कायम प्रतिनिधी व राजदूत टी.एस तिरुमूर्ती यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे की, १७ फेब्रुवारीला संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनियो गट्रेस यांनी एक पत्र परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांना पाठवले असून भारताने संयुक्त राष्ट्र शांती रक्षक सेनेला दोन लाख लस मात्रा देण्याचा जो प्रस्ताव मांडला आहे त्याचे स्वागत केले आहे.

 

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस गट्रेस यांनी म्हटले आहे की, करोना विरोधातील जागतिक प्रतिसादात भारताची कामगिरी कौतुकास्पद आहे. कारण त्या देशाने इतर देशांनाही लशीचा पुरवठा केला आहे. तिरुमूर्ती यांनी त्या पत्रातील तपशील दिला असून त्यात म्हटले आहे की, भारताने करोना विरोधातील जागतिक लढ्यात औषधे, लशी, व्हेंटिलेटर व व्यक्तिगत सुरक्षा संच यांचा पुरवठा दीडशे देशांना केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोविशिल्ड म्हणजेच ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या जागतिक वापरासाठी आपत्कालीन परवानगी दिली आहे. कोव्हॅक्स या लशींसाठीच्या आंतरराष्ट्रीय आघाडीलाही भारताने मदत केली आहे. कोव्हॅक्स या आघाडीमुळे जगातील सर्व देशांना लस मिळण्यास मदत होणार असून त्यात भेदभाव होणार नाही.

बुधवारी भारताने संयुक्त राष्ट्र शांतीरक्षक सेनेसाठी कोविड १९ प्रतिबंधक लशीचे दोन लाख डोस देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. जयशंकर यांनी असे म्हटले होते की, संयुक्त राष्ट्रांची शांतीसेना कठीण परिस्थितीत काम करीत असून त्यांच्यासाठी लशीचे दोन लाख डोस आम्ही देण्यास तयार आहोत. संयुक्त  राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात जयशंकर यांनी हा प्रस्ताव मांडला होता. त्यावेळी त्यांनी भगवद्गीतेचा दाखला देत लोकांच्या कल्याणासाठी भारत काम करील असे म्हटले होते.

 

इतर देशांना लशीच्या पुरवठ्यासाठी वाट पाहावी लागेल – पूनावाला

कोविड १९ प्रतिबंधक लस पुरवण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत पण इतर देशांना त्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल कारण आम्ही आधी भारताला प्राधान्य देत आहोत, असे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पूनावाला यांनी म्हटले आहे.

सीरमकडून ऑक्सफर्ड अ‍ॅस्ट्राझेनेका यांच्या कोविशिल्ड या करोना प्रतिबंधक लशीचे उत्पादन करण्यात आले आहे. भारताच्या गरजा पुरवत असतानाच जगातील इतर देशांनाही लस पुरवण्याचा आमचा प्रयत्न आहे, किंबहुना देशांतर्गत व परदेशातील पुरवठा यात समतोलही साधला जाईल पण त्याला थोडा वेळ लागेल, असे सांगून त्यांनी म्हटले आहे, की इतर देशांना लशीसाठी थोडी वाट बघावी लागणार आहे. आम्ही आमच्या परीने प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहोत. १५ फेब्रुवारीला जागतिक आरोग्य संघटनेने अ‍ॅस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड यांच्या कोविड लशींना आपत्कालीन जागतिक वापरासाठी परवानगी दिली होती. या लशीची निर्मिती अ‍ॅस्ट्राझेनेका एसके बायो ही कोरियन कंपनी व सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही भारतीय कंपनी करीत आहे.