केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा बंगला वास्तव्यासाठी दिला जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. सरकारी सुत्रांनुसार, अटलबिहारी वाजपेयी यांचा कृष्णा मेनन मार्गावरील बंगला अमित शाह यांच्या वास्तव्यासाठी तयार केला जात असून काम सुरु करण्यात आलं आहे.
२००४ मध्ये सरकार सत्तेतून बाहेर पडल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी कृष्णा मेनन मार्गावरील बंगल्यात वास्तव्यास गेले होते. जवळपास १४ वर्ष अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या कुटुंबासोबत तिथे वास्तव्य केलं. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात अटलबिहारी वाजपेयी यांचं निधन झाल्यानंतर कुटुंबाने नोव्हेंबर महिन्यात बंगला सोडला होता.
‘माजी पंतप्रधानांचा कृष्णा मेनन मार्गावरील अधिकृत बंगला अमित शाह यांना दिला जात आहे’, अशी माहिती सरकारी सुत्रांनी पीटीआयशी बोलताना दिली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री पदासोबत भाजपाध्यक्षदेखील असणाऱे अमित शाह यांनी नुकतीच बंगल्याची पाहणी केली आणि काही बदल सुचवले आहेत. त्यांनी सुचवलेल्या बदलानुसार काम सुरु करण्यात आलं आहे. एक ते दोन महिन्यात काम पूर्ण होईल असंही सुत्रांनी सांगितलं आहे.
लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळाल्यानंतर विजयाचे शिल्पकार असणारे अमित शाह यांना केंद्रीय गृहमंत्री पद देण्यात आलं आहे. सध्या ते ११ अकबर रोड येथील निवासस्थानी वास्तव्यास आहेत.
अटलबिहारी वाजपेयी कृष्णा मेनन मार्गावरील बंगल्यात वास्तव्यास आले तेव्हा बंगल्याचा क्रमांक ८ बदलून ६-A करण्यात आला होता. २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर दिल्लीत नेते वास्तव्यास असणाऱ्या कोणत्याही बंगल्याचं त्यांच्या मृत्यूनंतर स्मारक होणार नाही असा निर्णय करण्यात आला होता. अटलबिहारी वाजपेयी यांच्यासाठी राष्ट्रीय स्मृती स्थळाजवळ सरकारने ‘सदैव अटल’ स्मारक उभारलं आहे.