केंद्र सरकारने बुधवारी रब्बी मार्केटिंग हंगाम २०२६-२७ साठी सहा रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमती (MSP) जाहीर केल्या आहेत. यामध्ये गव्हाच्या सध्याच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल १६० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत ही एमएसपी वाढ मंजूर करण्यात आली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याच्या तोंडावर हा निर्णय घेण्यात आला आहे.

सरकारने रबी पिकांची २०२६-२७ च्या मार्केटिंग हंगामासाठी किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ केली आहे, जेणेकरून शेतकर्‍यांना त्यांच्या उत्पादनांची योग्य किंमत मिळेल. किमान आधारभूत किमतीमध्ये सर्वाधिक वाढ ही करडई (Safflower) साठी प्रति क्विंटल ६०० रुपये करण्यात आली आहे, त्यानंतर मसूरसाठी प्रति क्विंटल ३०० रुपयांची वाढ झाली आहे. मोहरी, हरभरा, बार्ली आणि गहू या पिकांसाठी अनुक्रमे प्रति क्विंटल २५० रुपये, २२५ रुपये, १७० रुपये आणि १६० रुपयांची वाढ जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती एका अधिकृत निवेदनात देण्यात आली आहे.

गव्हासाठी किमान आधारभूत किमत ही २५८५ रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आली आहे, जी सध्याच्या २४२५ रुपयांच्या किमान आधारभूत किमतीपेक्षा ६.६० टक्के जास्त आहे.

तर बार्ली या पिकासाठी किमान आधारभूत किंमत ही २१५० रुपये निश्चित केली आहे, जी गेल्या वर्षी जाहीर केलल्या १९८० रुपये प्रति क्विंटलपेक्षा १७० रुपये किंवा ८.५९ प्रति क्विंटलने जास्त आहे.

हरभऱ्यासाठी एमएसपी ही ५८७५ रुपये प्रति क्विंटर निश्चित करण्यात आली आहे, जी सध्याची एमएसपी ५,६५० रुपये प्रति क्विंटलहून २२५ रुपये म्हणजे ३.९८ टक्क्यांनी जास्त आहे. तर करडईच्या किमान आधारभूत किंमतमध्ये सर्वाधिक ६०० रुपयांनी वाढ झाली आणि ती ५९४० रुपयांवरून ६५४० रुपये प्रति क्विंटल झाली.

मोहरी पिकासाठीची एमएसपी ही प्रति क्विंटल ६२०० रुपये निश्चित करण्यात आली आहे. गेल्या वर्षी जाहीर केलेल्या ५९९० रुपयांच्या तुलनेत ही वाढ २१० रुपयांनी अधिक आहे. मसूरसाठीची एमएसपी प्रति क्विंटल ७००० रुपये निश्चित केली असून गेल्या वर्षी ती ६७०० रुपये प्रति क्विंटल इतकी होती.