नवी दिल्ली : दिवंगत खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना मरणोत्तर ‘विज्ञान रत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान पुरस्काराची शनिवारी घोषणा करण्यात आली. त्यामध्ये ‘विज्ञान रत्न’सह आठ ‘विज्ञानश्री’, १४ ‘विज्ञान युवा’ आणि एक ‘विज्ञान संघ’ पुरस्काराचा समावेश आहे. पद्म पुरस्कारांच्या धरतीवर बेतलेले राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार देशातील सर्वोच्च विज्ञान पुरस्कार असून पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे.
‘विज्ञान रत्न’ पुरस्कार हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये आयुष्यभरातील कामगिरी आणि योगदानाचा सन्मान करण्यासाठी दिला जातो. विज्ञानश्री हा पुरस्कार विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरीसाठी आहे. याच क्षेत्रात अनन्यसाधारण कामगिरी करणाऱ्या आणि वय वर्षे ४५च्या आत असलेल्या शास्त्रज्ञांचा सन्मान विज्ञान युवा पुरस्काराने केला जातो. तर विज्ञान संघ हा पुरस्कार तीन किंवा त्यापेक्षा अधिक शास्त्रज्ञ, संशोधक अथवा नवोन्मेषकांच्या संघाच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी योजला आहे.
पुरस्कारांचे मानकरी
विज्ञानश्री
ज्ञानेंद्र प्रताप (कृषी विज्ञान), युसुफ मोहम्मद शेख (अणुऊर्जा), के थांगराज (जीवशास्त्र), प्रदीप थलाप्पिल (रसायनशास्त्र), अनिरुद्ध भालचंद्र पंडित (अभियांत्रिकी विज्ञान), एस. वेंकट मोहन (पर्यावरणशास्त्र), महान महाराज (गणित आणि संगणकशास्त्र), जयन एन. (अवकाशशास्त्र आणि तंत्रज्ञान)
विज्ञान युवा
जगदीश गुप्ता कपुगंती (कृषी विज्ञान), सतेंद्र कुमार मंगरुथिया (कृषी विज्ञान), देबरका सेनगुप्ता (जीवशास्त्र), दीपा आगाशे (जीवशास्त्र), दिब्येंदु दास (रसायनशास्त्र), वलिउर रहमान (पृथ्वी विज्ञान), अरकाप्रवा बसू (अभियांत्रिकी विज्ञान), सब्यसाची मुखर्जी (गणित आणि संगणकशास्त्र), श्वेता प्रेम अग्रवाल (गणित आणि संगणकशास्त्र), सुरेश कुमार (वैद्यकीय), अमित कुमार अग्रवाल (भौतिकशास्त्र), सुरहुद श्रीकांत मोरे (भौतिकशास्त्र), अंकुर गर्ग (अवकाशशास्त्र आणि तंत्रज्ञान), आणि मोहनशंकर शिवप्रकाशम (तंत्रज्ञान आणि नवोपक्रम).
विज्ञान संघ जम्मू आणि काश्मीरमध्ये लव्हेंडर उपक्रम राबवणारा ‘सीएसआयआर ॲरोमा मिशन’ संघ
