चाचण्यांची संख्या वाढवा ! ; ‘ओमायक्रॉन’ला रोखण्यासाठी केंद्राचे राज्य सरकारांना आदेश

देशातील विविध विमानतळांवर उतरणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर बारकाईने नजर ठेवावी

coronavirus-1-2-3-3
प्रातिनिधिक छायाचित्र

नवी दिल्ली :

‘आरटीपीसीआर’ आणि ‘आरएटी’ या चाचण्यांद्वारेही ओमायक्रॉन हा करोनाचा नवा उत्परिवर्तित विषाणू समजू शकतो. या चाचण्यांच्या कचाटय़ातून तो सुटू शकत नाही. त्यामुळे चाचण्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांना दिले. सध्या देशात ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नसल्याने आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर बारकाईने लक्ष देण्याचीही सूचना केंद्राने केली आहे.

जगभरात ओमायक्रॉनचा फैलाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. सर्व राज्यांच्या आरोग्यविषयक तयारीचा आढावा भूषण यांनी बैठकीत घेतला.

आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची चर्चा या बैठकीत करण्यात आली. ही मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात राज्यांनी कोणत्याही प्रकारची हलगर्जी किंवा ढिसाळपणा करू नये. देशातील विविध विमानतळांवर उतरणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर बारकाईने नजर ठेवावी. विविध विमानतळे, बंदरे आणि सीमांवर कडक पहारा ठेवावा, अशा सूचना या बैठकीत करण्यात आल्या.

कोव्हिशिल्ड ६३ टक्के परिणामकारक

नवी दिल्ली : करोनावर मात करण्यासाठी अनेकांनी कोव्हिशिल्ड लस घेतली असली तरी या लशीच्या दोन्ही मात्रा करोनाशी लढण्यास ६३ टक्के परिणामकारक असल्याचे निरीक्षण ‘लॅन्सेट इन्फेक्शन डिसीज जर्नल’मध्ये नोंदवण्यात आले आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत कोव्हिशिल्ड ही लस प्रभावी ठरली. या लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांना या लशीची परिणामकारकता ६३ टक्के असल्याचे लॅन्सेटने म्हटले आहे. लॅन्सेटने यापूर्वी केलेल्या संशोधनात ही लस करोनाच्या मध्यम ते गंभीर आजाराशी लढण्यासाठी ८१ टक्के प्रभावी असल्याचे म्हटले होते. करोनाच्या दुसऱ्या लाटेत डेल्टा उत्प्रेरकाविरोधात लढण्यासाठी कोव्हिशिल्डच्या परिणामकारकतेचा अभ्यास लॅन्सेटने केला. या लशीच्या दोन्ही मात्रा घेणाऱ्या २,३७९ नागरिकांचा अभ्यास करण्यात आला. या नागरिकांचा अभ्यास केल्यानंतर लॅन्सेटला कोविशिल्ड लशीची परिणामकारकता मोजण्यास मदत झाली.

लॅन्सेटने यापूर्वी ‘भारत बायोटेक’च्या कोव्ॉक्सिन लशीची परिणामकारकता मोजली असून या लशीचे दोन्ही मात्रा करोनाशी लढण्यासाठी ५० टक्केच परिणामकारक असल्याचे निरीक्षण लॅन्सेटने नोंदवले होते.

हर घर दस्तक३१ डिसेंबपर्यंत

करोनावर मात करण्यासाठी लसीकरण महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे ‘हर घर दस्तक’ ही लसीकरणाची मोहीम ३१ डिसेंबपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Centre orders state governments to increase testing to stop omicron variant zws

ताज्या बातम्या