राजीव गांधी हत्याकांडातील सर्व सात आरोपींची सुटका करण्याच्या तामिळनाडू सरकारचा निर्णय तपासला जाईल, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी बुधवारी दिली.
दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींच्या हत्याकांडातील आरोपींची सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा  रद्द करून ती जन्मठेपेत बदली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तामिळनाडू सरकारने सातही आरोपींची मुक्तता करण्याबाबत निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री आरपीएन सिंग यांनी तामिळनाडू सरकारचा निर्णय चुकीचा आणि अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.
तामिळनाडू सरकारच्या निर्णयाबाबतचे पत्र अद्याप आलेले नाही. त्यामुळे एकदा ते मिळाले की ते तपासले जाईल आणि त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल,असे शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राज्य सरकारने घटनेतील तरतुदीनुसार सुटकेबाबत केंद्राकडे परवानगी मागितली आहे. केंद्राने जर तीन दिवसांत प्रतिसाद दिला नाही तर राज्य सरकार या आरोपींबाबत निर्णय घेईल,असे जयललिता यांनी स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालास सरकार बांधील आहे. मात्र, अफझल गुरुच्या फाशीप्रकरणी अकांडतांडव करणारा भाजप याप्रकरणी चकार शब्दही का काढीत नाही, अशी विचारणा केंद्रीय कायदामंत्री कपिल सिब्बल यांनी बुधवारी येथे केली.

राजीव गांधींचे मारेकरी आनंदी
वेल्लोर : फाशीची शिक्षा कमी करून जन्मठेपेची शिक्षा ठोठावल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राजीव गांधींच्या मारेकऱ्यांनी आधीच नि:श्वास टाकला. मात्र सुटका करण्याचा निर्णय तामिळनाडू सरकारने बुधवारी जाहीर केल्यानंतर या मारेकऱ्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही आणि त्यांनी तुरुंगातच आपला आनंद साजरा केला. मुरुगन, संतनम्, पेरारीवालन, नलिनी या चौघांखेरीज, रॉबर्ट पायस आणि जयकुमार हे श्रीलंकेचे नागरिक असलेले आरोपी पुझाल तुरुंगात असून रवीचंद्रन हा अन्य आरोपी मदुराईच्या तुरुंगात आहे. त्यांच्या सुटकेचा आदेश आल्यावर त्यांना तातडीने मुक्त केले जाईल.