Charles Haywood Post ABout India Netizens Thrashes with Facts : अमेरिकेतील उद्योगपती, ब्लॉगर व इन्फ्लुएन्सर चार्ल्स हेवूड यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर भारतीयांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे वाद सुरू झाला असून भारतीय युजर चार्ल्सच्या पोस्टवर कमेंट करून त्याच्यावर टीका करत आहेत. चार्ल्सने एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने म्हटलं आहे की “एखाद्या भारतीयाने (उपखंडातील) आधुनिक काळात कोणत्याही क्षेत्रात खरोखर मोठं असं काही साध्य केलं आहे का? मला एकही उदाहरण सुचत नाहीये. ग्रोकलाही (एक्सशी संबंधित एआय प्लॅटफॉर्म) सुचत नाहीये. हे थोडं विचित्रच आहे. मात्र, त्यांची संख्या १.५ अब्ज इतकी आहे. आपल्याला नेहमी सांगितलं जात की त्यांच्या प्रतिभेमुळे आपल्याला त्यांचं कौतुक करायला हवं.”

ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर भारतीयांनी चार्ल्सला सुनावलं आहे. त्याच्या पोस्टवर कमेंट्सचा पऊस पडू लागला आहे. लोक त्याला भारतीयांचं कर्तृत्व, विविध क्षेत्रातील भारतीयांचं योगदान, वेगवेगळ्या मोठ्या कंपन्यांच्या वरिष्ठ पदावरील भारतीय व्यक्तींची नावं आणि त्यांच्या कार्याची माहिती देत आहेत. एका युजरने म्हटलं आहे की “भारतानेच जगाला शून्याची देणगी दिली आहे. दुसऱ्या एका युजरने म्हटलं आहे की गणितातले दिग्गज, रामानुजन, सत्येंद्रनाथ बोस (Bose-Einstein), सी. व्ही. रमन (रमन इफेक्ट, नोबेल विजेते), एस. चंद्रशेखर (चंद्रशेखर लिमिट, नोबेल विजेते). खूप मोठी यादी आहे. पण सध्या एवढी नावं वाच. तुला भारतीयांचं गणित व विज्ञानातील योगदान समजेल.”

भारतीय नेटकऱ्यांकडून चार्ल्स हेवूडचा समाचार

आणखी एका युजरने कमेंट केली आहे की “मी एका अशा व्यक्तीला ओळखतो ज्याने अत्यंत अवघड ग्लुकोमा हा डोळ्यांचा आजार असलेल्या रुग्णांसाठी एक खास प्रकारची डोळ्यांवरील शस्त्रक्रियेची पद्धत शोधून काढली आहे. नेत्रविज्ञानात ते खूप प्रसिद्ध आहेत.” तर, दुसऱ्या एका युजरने म्हटलं आहे की “भारतीयांनी स्वतःच्या ताकदीवर खूप काही साध्य केलं आहे. भारतीयांना तुझ्यासारख्या लोकांच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.”

भांडवलदार दिलीप कुमार यांचं चार्ल्सला जशास तसं उत्तर

भारतीय उद्यम भांडवलदार (Venture Capitalist) दिलीप कुमार यांनी देखील चार्ल्सच्या पोस्टवर आक्षेप नोंदवला आहे. तसेच विविध क्षेत्रातील दिग्गज भारतीयांची नावं सांगत, त्यांच्या कामाची माहिती देत, नोबेल विजेत्या भारतीयांची नावं सांगत चार्ल्सला आरसा दाखवला आहे. तसेच यूपीआय हा देखील भारतीयांचाच अविष्कार असल्याचं सांगितलं.