Charlie Kirk on India Pakistan conflict Pahalgam terror attack : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय, पुराणमतवादी, उजव्या विचारसरणीचे पुरस्कर्ते चार्ली कर्क (वय ३१) यांची यूटाह येथील महाविद्यालयात आयोजित एका कार्यक्रमात गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने अमेरिकेत खळबळ उडाली आहे. या हत्येच्या घटनेनंतर डेमोक्रॅटिक व रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी हत्येचा निषेध नोंदवला आहे.

दरम्यान, कर्क यांनी मे महिन्यात भारत-पाकिस्तान संघर्ष चालू असताना यावर केलेली टिप्पणी समाजमाध्यमांवर व्हायरल होऊ लागली आहे. कारण त्यावेळी कर्क यांनी अमेरिकेला यात थेट सहभागी न होण्याचा सल्ला दिला होता. मात्र, या स्थितीत सावधगिरी बाळगणं गरजेचं असल्याचंही नमूद केलं होतं.

पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांनी काश्मीरच्या पहलगाममध्ये केलेला हल्ला आणि त्यानंतर भारताने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेल्या प्रत्युत्तरात्मक हल्ल्याबाबत (ऑपरेशन सिंदूर) कर्क यांनी ‘भारतात काय चाललंय?’ अशा शीर्षकासह एक पॉडकास्ट जारी केलं होतं. ज्यामध्ये भारत व पाकिस्तान युद्धाच्या उंबरठ्यावर असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

“पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देणारा धूर्त खेळाडू”

कर्क यांनी पाकिस्तानचा ‘दहशतवाद्यांना आश्रय देणारा धूर्त खेळाडू’ असा उल्लेख केला होता. तर भारताबद्दल ‘हिंदूबहुल राष्ट्र जे हल्ल्यांमुळे संतप्त झालंय’ अशी टिप्पणी केली होती. भारताने पाकिस्तानमधील नऊ ठिकाणी हवाई हल्ले केल्याचं सांगितलं होतं. कर्क म्हणाले होते की “या संघर्षात दोन्ही बाजूचं प्रचंड नुकसान झालं आहे. दोन्ही देशांनी आपली लढाऊ विमानं गमावली आहेत. यात काही डझन लोक मारले गेले आहेत. भारत व पाकिस्तान हे दोन्ही अण्वस्त्रधारी देश असून या दोघांमधील युद्ध अणुयुद्धात रुंपातरित होऊ शकतं. मात्र, त्यातून होणाऱ्या विध्वंसाची परस्परांना कल्पना असल्यामुळे अणुयुद्ध टळेल.”

“हे आपलं युद्ध नाही”, कर्क यांचा अमेरिकेला सल्ला

दरम्यान, कर्क यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की अमेरिकेने भारत-पाकिस्तान संघर्षात सहभागी होऊ नये. अमेरिका कदाचित भारताच्या बाजूने थोडं नैतिक समर्थन देऊ शकते कारण भारत इस्लामी दहशतवादाचा सामना करत आहे, त्यांना प्रत्युत्तर देत आहे. परंतु, अमेरिकेने त्याच्या पुढे जाऊ नये. कारण हे आपलं युद्ध नाही. हा आपला संघर्ष नाही.

भारत-पाकिस्तान संघर्ष चालू असताना जॉन बोल्टन व लिंडसे ग्रॅहम या दोन नेत्यांनी अमेरिकेन सरकारला सल्ला दिला होता की आपण यात लष्करी हस्तक्षेप केला पाहिजे. मात्र, कर्क या दोन्ही नेत्यांचा युद्धखोर असा उल्लेख करत म्हणाले, “पुरे झालं, हे आपलं युद्ध नाही. तो आपला भागही नाही. आपण संयम राखला पाहिजे.”