पुराणमतवादी आणि उजव्या विचारसरणीचे चार्ली कर्क यांच्या हत्या प्रकरणात तपास यंत्रणांना मोठे यश आले असून, संशयित मारेकऱ्याला पकडण्यात आल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी केली.

एका वाहिनीवर मुलाखतीत बोलताना ट्रम्प म्हणाले, ‘संशयिताला पकडण्यात आले असून, चार्ली यांची हत्या याच व्यक्तीने केल्याची शक्यता सर्वाधिक आहे. तपासामध्ये एका मंत्र्याचाही समावेश होता आणि त्याच्यामुळे संशयित पोलिसांच्या ताब्यात आला.’

कर्क यांचा संशयित मारेकरी पोलिसांच्या ताब्यात आहे. तपास यंत्रणेतील एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, की टेलर रॉबिन्सन (वय २२) असे संशयित मारेकऱ्याचे नाव आहे. या घटनेवर ‘एफबीआय’ आणि न्याय विभागाने भाष्य केलेले नाही. ‘एफबीआय’ आणि राज्यातील तपास यंत्रणांनी संशयित मारेकऱ्याला पकडण्यासाठी जनतेची साथ मागितल्यानंतर काही वेळातच संशयित मारेकऱ्याच्या अटकेचे वृत्त प्रसिद्ध झाले.

कर्क यांना गोळी मारणाऱ्याने हॅट, डोळ्यांवर चष्मा, लांब बाह्यांचा काळा शर्ट परिधान केला होता. त्याच्याकडे मोठी सॅक होती. घटनेनंतर ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांचा या घटनेशी संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हत्याप्रकरणात आतापर्यंत सात हजार सुगावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

तपास यंत्रणांना आत्तापर्यंत आरोपीच्या हाताचे, बुटाचे ठसे आणि उच्च दर्जाची रायफल सापडली आहे. पण, आरोपीचे नाव आणि हत्येमागील उद्देश तपास यंत्रणांना समजला नसल्याचे वृत्त संशयित मारेकऱ्याला पकडण्यापूर्वी प्रसिद्ध झाले होते.

दरम्यान, सॉल्ट लेक सिटी येथे कर्क यांच्या कुटुंबीयांची अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हेन्स आणि त्यांची पत्नी उशा यांनी भेट घेतली. कर्क यांना स्वातंत्र्यासाठीचे राष्ट्राध्यक्षांचे पदक हा अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात येईल, असे ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. कर्क यांच्या अंत्यसंस्काराला ट्रम्प उपस्थित राहण्याची शक्यता आहे.