अवघ्या जगाला आपल्या कवेत घेणाऱ्या ChatGPT ची पालक कंपनी असणाऱ्या OpenAI चे प्रमुख अर्थात CEO सॅम अल्टमन यांनी नुकतंच केलेलं एक विधान चर्चेत आलं आहे. ओपन एआयच्या सीईओ पदासाठी आपण योग्य व्यक्ती नसल्याचं विधान त्यांनी केलं आहे. ब्लूमबर्गनं दिलेल्या वृत्तानुसार, ओपन एआय जर भविष्यात सार्वजनिक मालकीची कंपनी झाली, तर अशा कंपनीचं नेतृत्व आपल्याला करता येणार नाही, असं सॅम अल्टमन यांनी नमूद केलं आहे. त्यांच्या या भूमिकेची आयटी जगतात चर्चा सुरू झाली आहे.
OpenAI कडून कम्प्युटिंग क्षेत्रातील पायाभूत सुविधांमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना असून त्यासंदर्भात सॅम अल्टमन माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल त्यांनी ओपन एआयच्या भवितव्याबाबत आपली भूमिका मांडली.
नेमकं काय म्हणाले Sam Altman?
सॅम अल्टमन यांनी भविष्यात जर ओपन एआयनं आपलं स्वरूप बदललं, तर आपण या कंपनीच्या सीईओपदी राहण्यास योग्य व्यक्ती नसू, असं मत व्यक्त केलं आहे. भविष्यात कधी ना कधी ओपन एआयला सार्वजनिक भागीदारीच्या दिशेनं वाटचाल करावीच लागेल. पण अशा कंपनीचं मी नेतृत्व करू शकणार नाही, असं ते म्हणाले. त्यामुळे भविष्यात एकीकडे ओपन एआयचं पूर्ण स्वरूप खासगी भागीदारीपासून सार्वजनिक भागीदारी प्रकाराच बदणार असल्यावर अल्टमन यांना एकप्रकारे शिक्कामोर्तब केलं. त्याचवेळी, याअनुषंगाने कंपनीच्या नेतृत्वबदलाचेदेखील सूतोवाच सॅम अल्टमन यांनी केले.
“कदाचित अर्थतज्ज्ञ याला वेडेपणा म्हणतील पण…”
दरम्यान, सॅम अल्टमन यांनी यावेळी ओपन एआयच्या आगामी गुंतवणूक नियोजनाबद्दल माहिती दिली. ओपन एआय नजीकच्या भविष्यकाळात कम्प्युटिंग इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात काही ट्रिलियन डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचं ते म्हणाले. “कदाचित अर्थतज्ज्ञ या निर्णयाला वेडेपणा म्हणतील, पण तरीदेखील ओपन एआय याची अंमलबजावणी करणार आहे. आम्हाला आमच्या नियोजनानुसार गोष्टी करू द्या”, असं सॅम अल्टमन यांनी या मुलाखतीदरम्यान नमूद केलं.
ChatGPT नं आत्तापर्यंत केलेला व्यवसाय…
एका माहितीनुसार, चॅटजीपीटीनं लाँचिंगपासून आत्तापर्यंत म्हणजे मे २०२३ पासून जवळपास २ बिलियन डॉलर्सची कमाई केल्याचं समोर आलं आहे. क्लाऊड, कोपायलट आणि ग्रूकसारख्या चॅटजीपीटीच्या स्पर्थक अॅपनं आजतागायत केलेल्या कमाईपेक्षा हे प्रमाण तब्बल ३० पट अधिक आहे. चालू वर्षात म्हणजेच २०२५ मध्ये आत्तापर्यंत चॅटजीपीटीनं १.३५ बिलियन डॉलर्सची कमाई केली आहे. गेल्या वर्षीपेक्षा हे प्रमाण तब्बल ६७३ टक्के अधिक आहे.