२० जानेवारीला रात्री जेव्हा डोनाल्ड ट्रंम्प अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाची शपथ घेत होते आणि त्यानंतर व्हाईट हाऊसमध्ये बसून सुरूवातीच्या औपचारिकता पार पाडत होते तेव्हा त्यांच्यासोबत असलेल्या एका हँडसम चेहऱ्याच्या लहान मुलाकडे सगळ्यांचं लक्ष जात होतं.

हा कोण आहे? किती गोड आहे वगैरेच्या प्रतिक्रिया नेटवर येणं सुरू झालं होतंच. पण कोणाला काही थांगपत्ता लागत नव्हता. अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा हा मुलगा आहे हे कळल्यावर सर्वांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या.

हा आहे बॅरन ट्रम्प. जगातल्या सर्वशक्तिमान राष्ट्राध्यक्षांचा मुलगा. हा फक्त १० वर्षांचा आहे. पण ट्रम्प यांच्या निमित्ताने त्यांच्या टीकाकारांच्या नजरा बॅरनकडेही वळल्या. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाले यात छोट्या बॅरनची काय चूक? पण ट्रम्पविरोधाने आंधळे झालेल्यांना याचंही काही सोयरसुतक राहिलं नाही. आता १० वर्षांचा असलेला बॅरन मोठा झाल्यावर एक खुनी होईल एवढं म्हणण्याइतपत या लोकांची मजल गेली. डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेतल्या गन लाॅबीच्या असणाऱ्या पाठिंब्यावरून बॅरनला हे टोमणे दिले जात होते. ट्विटरवर तर या सगळ्यांना मोकळं रानच मिळालं होतं. हे सगळं करताना डोनाल्ड ट्रम्पविरोधक हे विसरले होते की काही झालं तरी बॅरन एक १० वर्षांचा मुलगा आहे. त्याच्या वडिलांनी घेतलेल्या कुठल्याही वादग्रस्त भूमिकेमध्ये अथवा वक्तव्यामध्ये त्याचा काडीचाही वाटा नाही. पण ट्विटर फौजेला या सगळ्याचंही भान राहिलं नाही.

आता बॅरनच्या मदतीला धावली आहे ती चेल्सी क्लिंटन. नव्वदीच्या दशकात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहिलेले बिल क्लिंटन यांची चेल्सी क्लिंटन ही मुलगी. राष्ट्राध्यक्षांची मुलगी म्हणून तिलाही नको तेवढ्या प्रसिध्दीच्या झोताचा सामना करावा लागला. त्यामुळे बॅरन ट्रम्पपुढे काय वाढून ठेवलंय, याची कल्पना येत तिने या सगळ्या टीकाकारंना ट्विटरच्या माध्यमातून ठणकावलंय.

सगळ्या मुलांना अधिकार असतो तसा बॅरनलाही लहानपण अनुभवण्याचा संपूर्ण अधिकार आहे असं फर्मावत तिने या सगळ्या टीकाकारांना दूर राहायला सांगितलंय.

पण त्याचबरोबर आपण डोनाल्ड ट्रम्प यांच्या लहान मुलांना मारक ठरणाऱ्या धोरणांना विरोधही करणार असल्याचं स्पष्ट केलंय.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या बेताल वक्तव्यांना आणि वागण्याला ते स्वत:च जबाबदार आहेत. आणि याचं भानही त्यांच्या टीकाकारांनी ठेवलं पाहिजे. नाहीतर ट्रम्प यांच्या कुटुंबीयांविरूध्द बेछूट वक्तव्य करत त्यांना लक्ष्य करणारे टीकाकार डोनाल्ड ट्रम्प यांच्याच परंपरेचे पाईक आहेत असं म्हटलं पाहिजे