सामान्यपणे पोलीस म्हटल्यावर अनेकांची नाके मुरडली जातात. बहुतांशी लोकांचे पोलिसांबद्दल नकारात्मक मत असते. पोलीस पैसे खातात, सहकार्य करत नाही, उद्धटपणे वागतात असे आरोप अनेकदा केले जातात. मात्र सगळेच पोलीस असे नसतात. अनेकदा आपल्या कर्तव्य बजावण्याबरोबरच सामाजिक भान म्हणून पोलीस असं काही करुन जातात की त्यांना सलाम करावासा वाटतो. असाच एक प्रकार चेन्नईमध्ये घडला आहे. चेन्नई पोलिसांनी सुदान देशाचा नागरिक असणाऱ्या एक व्यक्तीला स्वदेशी जाण्यासाठी चक्क ७० हजारांची मदत केली आहे.
मुळचा सुदानचा असणारा मोहम्मद अल मुस्ताफा हा २०१० साली भारतामध्ये शिक्षणासाठी आला होता. २०१६ साली अभ्यासक्रमाची शेवटची परिक्षा दिल्यानंतर २०१६ साली तो सुदानला परत गेला. मात्र त्याच वर्षी तो पुन्हा परिक्षा देण्यासाठी भरतात परत आला. दुसऱ्या प्रयत्नाही तो परिक्षा उत्तीर्ण झाला नाही. २०१७ साली त्याचा व्हिसा संपला. ‘माझ्याकडे अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे किंवा घरी जाण्याचेही पैसे नव्हते. त्यामुळे उपजिविकेसाठी मी चेन्नईमधील मरिना समुद्रकिनाऱ्यावर पडेल ते काम करुन दिवस काढले,’ असं मुस्ताफा सांगतो. मात्र २ ऑगस्ट २०१८ साली मरिना पोलिसांनी मुस्ताफाला अटक केली. स्थानिक मुलांबरोबर झालेल्या वादानंतर स्वसंरक्षणासाठी त्यांना चाकू दाखवल्याचा आरोपाखाली पोलिसांनी मुस्ताफा ताब्यात घेतले. नंतर चार महिन्यांच्या तुरुंगवासानंतर डिसेंबर महिन्यात त्याला सोडून देण्यात आले. पोलिसांनी सुटका केल्यानंतर काही महिन्यांनी मुस्ताफाने मायदेशी परत जाण्यासाठी पोलिसांकडेच मदत मागण्याचा निर्णय घेतला. ‘मागील आठवड्यात मुस्ताफाने आमच्याकडे मायदेशी परत जाण्यासाठी मदत करा अशी विनंती केली. आम्ही त्याच्या आई-वडिलांना संपर्क साधला असता त्यांनी पैसे नसल्याची माहिती दिली,’ असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
अखेर मुस्ताफाची मदत करणारे कोणीच नसल्याचे लक्षात आल्यानंतर काही पोलीस अधिकाऱ्यांनीच त्याला मदत करण्यासाठी पैसे गोळा करण्याचा निर्णय घेतला. या कल्पनेला पोलीस आयुक्त ए. के. विश्वनाथ यांनीही पाठिंबा दर्शवला. अखेर पोलिसांनी आठवड्याभरामध्ये ७० हजारांची रक्कम जमा करण्यात यश मिळवले. या पैकी आठ हजार रुपये हे मोहम्मदच्या मित्राने दिले. या पैशातून मुस्ताफाने तिकीट काढून तो शनिवारी सुदानला गेला. मुस्ताफाला तिकिट काढण्यासाठी मदत करणारे निरिक्षक एस. यजराज याबद्दल बोलताना म्हणतात, ‘घरी जाण्यासाठी मुस्ताफा खूपच उत्सुक होता. तीन वर्षे तो त्याच्या घरच्यांना भेटला नव्हता. मायदेशात जाऊन शेती करायची इच्छा असल्याचे त्याने सांगितले होते.’ चेन्नई पोलिसांनी केलेल्या मदतीमुळे आज मुस्ताफा आपल्या कुटुंबाबरोबर आहे.