Agilysium gifts Hyundai Creta SUVs to its 25 longest-serving employees: चेन्नई येथील अॅजिलिसियम या स्टार्टअप कंपनीने स्थापनेपासून नोकरीला असलेल्या २५ कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या निष्ठेची दखल घेत ह्युंदाई क्रेटा एसयूव्ही भेट दिल्या आहेत. चेन्नईच्या प्रसिद्ध वर्ल्ड ट्रेड सेंटरमधील अॅजिलिसियमच्या कार्यालयात ५०० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती कंपनीच्या १०व्या वर्धापनदिनानिमित्त या २५ कर्मचाऱ्यां हाती गाडीची चावी देण्यात आली. विशेष म्हणजे कंपनीने याबाबत कर्मचाऱ्यांना कोणतीही माहिती न देता क्रेटाच्या रुपात सरप्राइज गिफ्ट दिले. याचबरोबर कंपनीने यावेळी सर्व स्तरांवर कामगिरीवर आधारित वेतनवाढीची घोषणाही केली.
अॅजिलिसियमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राज बाबू यांनी द हिंदू बिझनेसलाइनला सांगितले की, “आम्हाला नेहमीच असे वाटते की, आमच्या कर्मचाऱ्यांनीच आमची वेगळी ओखळ निर्माण केली आहे. ही कृती केवळ त्यांच्या कामगिरीला दिलेल्या बक्षीसापेक्षा खूप काही आहे.”
त्यांनी पुढे म्हटले की, “जेव्हा कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाला मान्यता मिळत असल्याचे लक्षात येते तेव्हा त्यांचे मनोबल वाढते, कंपनीशी भावनिक नाते निर्माण करते आणि इतरांना आणखी चांगले काम करण्यासाठी प्रेरित करते.”
कंपनीने लिक्डइनवर दिली माहिती
दरम्यान अॅजिलिसियमने लिंक्डइनवर कार्यक्रमाचे फोटो शेअर करत याची माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आम्ही दहा वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना एसयूव्ही कार भेट देऊन सन्मानित केले.” दरम्यान लिंक्डइनवर कंपनीच्या या फोटोंवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सोशल मीडियावर कंपनीचे कौतुक
एका युजरने टिप्पणी केली की, “लोकांना इतके महत्त्व देणाऱ्या कंपनीत कार्यरत असणे खरोखरच प्रेरणादायी आहे. गेल्या दशकात अॅजिलिसियमच्या यशाला आकार देणाऱ्या प्रत्येकाचे अभिनंदन!”
“वाह, एसयूव्ही भेट देणे ही खूप मोठी गोष्ट आहे! दहा वर्षे हा एक मैलाचा दगड आहे. हा निष्ठा आणि टीमवर्कचा खरा उत्सव वाटतो”, अशी टिप्पणी दुसऱ्या एका युजरने केली.
दरम्यान कंपनीच्या या कृतीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. लाखो युजर्नी कंपनीचे कौतुक केले आणि म्हटले की, त्यांनी कर्मचाऱ्यांना भत्त्यांपेक्षा जास्त महत्त्व दिले आहे.