नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले कॉंग्रेसचे नेते नंदुकमार पटेल आणि महेंद्र कर्मा यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. गेल्या शनिवारी छत्तीसगढमधील बस्तरमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात परिवर्तन यात्रेवर निघालेल्या कॉंग्रेसच्या तब्बल २७ नेत्यांची हत्या करण्यात आली. पटेल आणि कर्मा हे दोन्ही नेते नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात जागीच ठार झाले. 
कर्मा यांच्या कुटुंबीयांना नक्षलवाद्यांकडून धमकीचे पत्र मिळाल्याची माहिती त्यांनी छत्तीसगढमधील राज्य सरकारला दिली. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. कर्मा यांच्या कुटुंबीयांना झेड प्लस दर्जाची तर पटेल यांच्या कुटुंबीयांना झेड दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली आहे. मुख्यमंत्री रमणसिह यांनी त्या स्वरुपाचे आदेश राज्यातील गृह खात्याला दिले आहेत.