छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भाग असणाऱ्या कांकेर जिल्ह्यातील सर्वाधिक संवेदनशील अशा दुर्गुकोंदलमधील कोंडेगांव येथे मंगळवारी सायंकाळी नक्षलवाद्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याची गोळी झाडून हत्या केली. पोलीस अधीक्षक केएल ध्रुव यांनी सांगितल्याप्रमाणे सायंकाळी सात वाजता जवळपास २५ सशस्त्र नक्षलवादी कोंडेगांवमध्ये घुसले व संघाचे स्वयंसेवक दादूराम कोरोटी यांना त्यांच्या घरापासून दूर नेत त्यांची गोळी मारून हत्या केली.

नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर पोलीसांसाठी काम करत असल्याचा आरोप लावला होता, या आशयाची काही पत्रक देखील नक्षलवाद्यांकडून फेकण्यात आली होती. घटनेची माहिती मिळाताच दुर्गुकोंदलवरून पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले होते.

मे महिन्यातही छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भाग असलेल्या दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांनी भाजपाचे आमदार भीमा मंडावीसह पाच जणांची हत्या केली होती. यानंतर पोलिसांनी हा हल्ला घडवून आणणाऱ्या मास्टरमाइंडला ठार केले होते. तर, जून महिन्यात नक्षलवाद्यांनी समाजवादी पार्टीचे संतोष पुनेम यांची बीजापूर जिल्ह्याजवळ हत्या केली होती.