पीटीआय, नवी दिल्ली

सर्वोच्च न्यायालय हे उच्च न्यायालयापेक्षा श्रेष्ठ नाही. दोन्ही न्यायालये घटनात्मक आहेत आणि कोणतीही बाजू श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही, असे सरन्यायाधीश भूषण आर. गवई यांनी शनिवारी स्पष्ट केले. ते ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

बार असोसिएशनचे अध्यक्ष विकास सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाला (कॉलेजिअम) उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीशपदासाठी सर्वोच्च न्यायालयात सराव करणाऱ्या वकिलांचाही विचार करण्याचे आवाहन केले होते.

यावर सरन्यायाधीश गवई म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायवृंद उच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाला विशिष्ट नावाची शिफारस करण्यास सांगू शकत नाही. सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयापेक्षा श्रेष्ठ नाही. दोन्ही न्यायालये घटनात्मक आहेत आणि घटनात्मक योजनेनुसार, ती एकमेकांपेक्षा कनिष्ठ किंवा श्रेष्ठ नाहीत. त्यामुळे न्यायाधीशपदाची नियुक्ती करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या न्यायवृंदानेच पहिला निर्णय घेतला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.