New Parliament Building Inauguration by PM Modi Live Updates : आज नव्या संसद भवनाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ऐतिहासिक अशा सेंगोल या राजदंडाचे लोकसभेत स्थापना करण्यात आली आहे. आजचा हा कार्यक्रम ऐतिहासिक करण्याकरता मोदी सरकारने अतोनात प्रयत्न केले. परंतु, उद्घाटन आणि आमंत्रणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन न झाल्याने देशातील एकूण २० विरोधकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “संसद लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे. तुमचा विरोध एका व्यक्तिला समजू शकतो. पण या लोकशाहीमध्ये सार्वभौम संसद भवन आहे तिथून १४० कोटी जनतेला न्याय देण्याचं काम होतं, त्यावर बहिष्कार टाकता हे दुर्दैवी आहे. देशातील १४० कोटी जनता हे पाहतेय. अशाप्रकराची उद्घाटने याआधीही इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी केली आहेत. हे सर्वांना माहितेय.” दिल्लीतील महाराष्ट्र भवनात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी साधलेल्या संवादात त्यांनी विरोधकांवर टीका केली.
हेही वाचा >> “उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिलीच, आता काँग्रेसवासी…”, आशिष शेलारांचा घणाघात
“२०१९ मध्ये नव्या संसद भवनाची संकल्पना मांडली होती आणि २०२३ ला प्रत्यक्षात उद्घाटन होतंय. मोदींच्या शुभहस्ते त्याचं उद्घाटन होतंय ही देशवासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम केला म्हणून विरोधकांना वावडं आहे का? पोटदुखी आहे का? खरं म्हणजे १४० कोटी जनता पंतप्रधानांच्या पाठीशी खंबीर आहे. ज्यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे त्यांना या देशातील जनता योग्यवेळी उत्तर देईल”, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
काविळ झालेल्यांना…
“सगळ्यांना निमंत्रण पाठवलं होतं. सगळ्यांचं स्वागत झालं आहे. आज पाहिलं आपण सर्व होते. सर्व जाती धर्माचे लोक तिथे होते. कोणालाही डावलण्याचा विषय नव्हता. परंतु काविळ झालेल्या लोकांना सर्व पिवळं दिसतं. त्यामुळे मोदीं काहीही केलं तर विरोधकांना वाईटच दिसतं”, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
सर्व रेकॉर्ड मोडणार
“लोकशाहीचं हे पवित्र मंदिर आहे. लोकशाही टिकवायची असेल तर सर्वांनी एकत्र यायला पाहिजे होतं. २०१९ ला सर्व एकत्र आले होते. पालापाचोळ्यासारखे उडून गेले. २०१४ पेक्षा २०१९ मध्ये मोदींच्या नेतृत्त्वामध्ये जास्तीच्या जागा आल्या, २०२४ ला देखील सर्व रेकॉर्ड मोडतील. १४० कोटी जनता जी मोदींसाहेबांच्या पाठिशी आहे, त्यामुळे २०२४ ला आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडतील”, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.