पक्षादेश न पाळल्यामुळे जनता दल युनायटेडमधून सोमवारी बिहारचे मुख्यमंत्री जितन राम मांझी यांचीच हकालपट्टी करण्यात आली. या कारवाईमुळे बिहारमधील राजकीय तिढा आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. माजी मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव सोमवारी दुपारी बिहारच्या राज्यपालांची भेट घेणार असून, त्यांच्याकडे मांझी यांची मुख्यमंत्रिपदावरूनही हकालपट्टी करण्याची मागणी करणार आहेत.
बिहार विधानसभेत २४३ जागा आहेत. त्यापैकी जनता दल युनायटेडचे ११५ आमदार आहेत. हे सर्व आमदार आपल्याच पाठिशी असल्याचा दावा नितीशकुमार यांनी केला आहे. त्याचवेळी भाजपकडे असलेल्या ८८ आमदारांनी मांझी यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचबरोबर तीन अपक्षांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे. बिहार विधानसभेत आपल्या सरकारकडे बहुमत असल्याचे मी येत्या २० फेब्रुवारीला दाखवून देईन. तसे नाही झाले तरच आपण राजीनामा देऊ, असे मांझी यांनी रविवारी दिल्लीमध्ये बोलताना स्पष्ट केले होते. सध्यातरी आपण मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार नाही, असेही त्यांनी सांगितले. मांझी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली होती.