पीटीआय, उज्जैन, भोपाळ
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरातील ‘महाकाल लोक कॉरिडॉर’मध्ये मूर्ती कोसळून त्यांचे नुकसान झाल्याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सोमवारी दिली. रविवारी आलेल्या वादळात या कॉरिडॉरमधील सातपैकी सहा मूर्ती वादळामध्ये कोसळून त्यांचे नुकसान झाले.




विरोधी पक्ष काँग्रेसने या संपूर्ण प्रकाराच्या चौकशीची मागणी केली आणि या प्रकरणाच्या तपासासाठी पक्षाची चौकशी समिती स्थापन केली. काँग्रेसने या प्रकल्पाच्या दर्जाबद्दल चौकशीची मागणी केली आहे तसेच या प्रकल्पात सत्ताधारी भाजपने भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये या कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले होते. रविवारी आलेल्या वादळामध्ये दुपारी ४च्या सुमाराला सहा मूर्ती कोसळल्या आणि त्यांचे नुकसान झाले. यामध्ये कोणीही व्यक्ती जखमी झाली नाही. या घटनेनंतर हा परिसर काही वेळ बंद करण्यात आला. ‘महाकाल लोक’ प्रकल्पाचा एकूण अपेक्षित खर्च ८५६ कोटी रुपये इतका असून त्यापैकी पहिल्या टप्प्यासाठी ३५१ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
‘महाकाल लोक कॉरिडॉर’ उज्जैनमधील प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिराच्या आवारात बांधण्यात आला आहे. त्यामध्ये सप्तर्षीच्या मूर्ती भाविक आणि पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. त्याच सप्तर्षीपैकी सहा मूर्ती वादळात कोसळल्यामुळे काँग्रेसने चौकशीसाठी सात-सदस्यीय समिती नेमल्याचे सांगितले. त्यामध्ये पाच आमदारांचा समावेश आहे. चौकशीनंतर ही समिती आपला अहवाल प्रदेश काँग्रेस समितीकडे सोपवेल. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते यांनी या प्रकरणी सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, मूर्ती कोसळल्याचे चित्र कोणत्याही धार्मिक व्यक्तीसाठी क्लेशदायक आहे, सरकारने या मूर्ती तातडीने बसवाव्यात, अशी मी मागणी करतो.
मात्र, काँग्रेसने यापूर्वी सिंहस्थच्या आयोजनातही भ्रष्टाचाराचा आरोप करून त्याच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली होती, मात्र त्यामध्ये त्यांना काहीही आढळले नव्हते, अशी टीका भाजप प्रवक्ते पंकज चतुर्वेदी यांनी केली.
नुकसान झालेल्या मूर्ती फायबरपासून तयार करण्यात आल्या होत्या. इतक्या उंच ठिकाणी दगडाच्या मूर्ती बसवणे शक्य नव्हते. मी या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करायला सांगितले आहे. – शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री, मध्य प्रदेश
काँग्रेस सरकारने महाकाल मंदिराचे भव्य संकुल उभारण्याचा निर्धार केला होता तेव्हा नंतरचे सरकार ‘महाकाल लोक’च्या बांधकामात असा निकृष्टपणा राखेल अशी आम्ही कल्पनाही केली नव्हती. – कमलनाथ, माजी मुख्यमंत्री, मध्य प्रदेश