अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना व्हायरसला चिनी व्हायरस म्हटल्यानंतर चीनचा चांगलाच संताप झालाय. चीनच्या परदेश मंत्रालयाने ट्रम्प यांच्या विधानाचा निषेध करत कठोर शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, अशाप्रकारची विधाने न करण्याचा इशारा अमेरिकेला दिला आहे. दरम्यान, चीनने द न्यू-यॉर्क टाइम्स, द वॉशिंगटन पोस्ट आणि द वॉल स्ट्रीट जर्नल या अमेरिकेच्या तीन आघाडीच्या वृत्तपत्रांना बॅन केले आहे. चीनने या तिन्ही अमेरिकी वृत्तपत्राच्या पत्रकारांना देशातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये परदेशी माध्यमांवर चीनकडून झालेली ही सर्वात कठोर कारवाई आहे.

सोमवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना व्हायरसचा उल्लेख करताना त्याला चिनी व्हायरस म्हटले होते. त्यानंतर चीनकडून अमेरिकी माध्यमांवर ही कारवाई करण्यात आली आहे. पण, चिनी माध्यमांविरोधात अमेरिकेने केलेल्या कारवाईमुळे आम्ही त्यांच्या माध्यमांवर कारवाई केली असे चिनी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. तर, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पियो यांनी चीनला केलेल्या कारवाईवर विचार करण्याचं आवाहन केलं आहे. ट्रम्प प्रशासनाने चीनच्या सरकारी मीडियाशी निगडीत निवडक चिनी पत्रकारांनाच देशात राहण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतल्यामुळे आम्ही प्रत्युत्तरात हा निर्णय घेतल्याचा दावा चीनकडून करण्यात आला आहे. यापूर्वी, सोमवारी(दि.१७) डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना व्हायरसचा उल्लेख करताना त्याला चिनी व्हायरस म्हटले होते. ‘चिनी व्हायरस’मुळे प्रभावित झालेल्या एअरलाइन्स आणि अन्य उद्योगांना अमेरिका जोरदार समर्थन देईल. आम्ही पूर्वीपेक्षा सामर्थ्यवान होऊ! अशा आशयाचे ट्विट ट्रम्प यांनी केले होते.


याआधी, काही दिवसांपूर्वी करोनाच्या फैलावासाठी अमेरिकी सैनिक जबाबदार असल्याचा दावा चिनकडून करण्यात आला होता. त्यानंतर अमेरिकेने अशाप्रकारची विधाने खपवून घेतली जाणार नाहीत असा इशारा दिला होता. त्यानंतर आता ट्रम्प यांच्या चिनी व्हायरस विधानावरुन चीनचा अजून तीळपापड झाला आहे.