आपल्या महत्त्वाकांक्षी आणि ऐतिहासिक अशा चांद्र मोहिमेदरम्यान चीनने प्रथमच चंद्रावर एक ‘रोव्हर’ (वाहन) उतरले.
 चांद्रभूमीच्या संरचनेचा अभ्यास करणे आणि त्यासाठी आवश्यक ते नमुने गोळा करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे, असे चीनच्या अवकाश मोहीम विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले. अमेरिका, रशिया यांच्यानंतर असा प्रयोग करणारा चीन हा जगातील तिसरा देश ठरला आहे.
चीनच्या स्थानिक प्रमाणवेळेनुसार शनिवारी रात्री ९ वाजता चँग ई – ३ हे चांद्र वाहन चंद्राच्या भूमीवर उतरेल, असा अंदाज आहे. तत्पूर्वी ३ डिसेंबर रोजी लाँग मार्च – थ्री बी या यानातून चांद्र वाहन प्रक्षेपित करण्यात आले. चंद्राच्या पृष्ठभागावर सुमारे ४०० मैल पसरलेल्या ‘द बे ऑफ रेनबो’ या पठारावर सदर वाहन उतरणार असल्याची माहिती मोहिमेच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.  पृष्ठभागाचा उंचसखलपणा अभ्यासण्यासाठी हे ‘रोव्हर’ त्रिमितीय छायांकनाची सुविधा आणि सेन्सर यांचा वापर करणार आहे.