चीनने त्यांच्या संरक्षण खर्चात १२.२ टक्के इतकी वाढ केली असून त्यांचा संरक्षण खर्च भारताच्या ३६ अब्ज अमेरिकी डॉलर इतक्या संरक्षण तरतुदीपेक्षा खूपच जास्त आहे.
चीनने संरक्षणासाठी १३२ अब्ज डॉलरची तरतूद केली आहे. चीनने त्यांची संरक्षण तरतूद १२.२ टक्के वाढवून ८०८.२ अब्ज युआन म्हणजे १३२ अब्ज अमेरिकी डॉलर इतकी केली आहे, असे पंतप्रधान ली केकियांग यांनी चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसमध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पीय प्रस्तावात म्हटले आहे.
२०१३ मध्ये चीनने देशाच्या संरक्षणासाठी ७२०.१९७ अब्ज युआन म्हणजे ११७.७ अब्ज अमेरिकी डॉलर खर्च केला होता. त्यावेळी तो खर्च किंवा तरतूद ही २०१२ पेक्षा १०.७ टक्क्य़ांनी अधिक होती. भारताच्या दृष्टीने विचार करता चीनचा संरक्षण खर्च फारच अधिक असून आपल्या अंतरिम अर्थसंकल्पात संरक्षण खर्च केवळ १० टक्के वाढवला आहे. चीनची संरक्षण खर्चाची यंदाची तरतूद भारतापेक्षा ३६ अब्ज डॉलरनी अधिक आहे. चीनच्या संरक्षण अर्थसंकल्पात यावेळी लष्कराच्या आधुनिकीकरणावर भर दिला आहे.
 एनपीसीचे प्रवक्ते फु यिंग यांनी चीनच्या वाढत्या संरक्षण तरतुदीचे समर्थन करताना सांगितले की, आमचा इतिहास पाहता आम्हाला असे वाटते की, शांतता ही केवळ शक्तीच्या जोरावर राखता येते.