आपत्ती निरीक्षण व व्यवस्थापन, हवाई निरीक्षणास उपयुक्त
मोबाइल आणि इतर स्मार्ट डिव्हाइसमधील कॅमेऱ्यांच्या ‘पिक्सल क्षमतेची’ दोन दशक अंकी संख्यादेखील अफाट वाटण्याच्या काळात चिनी तंत्रज्ञांनी १०० मेगापिक्सलचा कॅमेरा विकसित करून तंत्रज्ञानविश्वाला चक्रावून सोडले आहे. या कॅमेऱ्याचा वापर आपत्ती निरीक्षण व व्यवस्थापन, अत्याधुनिक वाहतूक व्यवस्था, हवाई निरीक्षण यासाठी करता येईल.
विशेष काय? : अतिशय संवेदनशील अशा या कॅमेऱ्याचा वापर शहर नियोजन, आपत्ती व्यवस्थापन व तंत्राधिष्ठित वाहतूक प्रणालीसाठी करता येईल.
अत्याधुनिक वाहतूक व्यवस्थेत वाहतूक प्रणालीचा ‘स्मार्ट’ वापर करता येतो. या कॅमेऱ्यात अत्याधुनिक प्रकाशीय व नियंत्रण यंत्रणा, डाटा रेकॉर्डिग प्रणाली आहे. राष्ट्रीय दूरसंवेदन प्रणालीचा भाग म्हणून या कॅमेऱ्याचा चाचणी स्तरावर वापर यशस्वी ठरला आहे. २००१ ते २००५ या दहाव्या पंचवार्षिक योजनेत ८१ मेगापिक्सेलचा आणखी एक कॅमेरा विकसित करण्यात आला आहे. एक मेगापिक्सेल म्हणजे दहा लाख रंगबिंदू असतात व ही संकल्पना केवळ रंगबिंदू दर्शवते असे नाही, तर कुठल्याही डिजिटल कॅमेऱ्यातील प्रतिमा संवेदक घटकांची संख्याही दर्शवते.
नवे काय? : आयओई-३ कॅनबन हा कॅमेरा चायनीज अॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या इन्स्टिटय़ूट ऑफ ऑप्टिक्स अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स या संस्थेने तयार केला असून, तो चीनचा सर्वात जास्त मेगापिक्सेल कॅमेरा आहे. या कॅमेऱ्याच्या मदतीने १०२४० बाय १०२४० मेगापिक्सेल इतक्या रंगबिंदू क्षमतेची छायाचित्रे काढता येतात. त्याचे वैशिष्टय़ म्हणजे तो लहान व वजनाला हलका आहे. त्याचा जास्त रुंद भाग हा १९.३ सें.मी.चा आहे. हा कॅमेरा उणे २० अंश सेल्सियस ते ५५ अंश सेल्सियस या तापमान मर्यादेत वापरता येतो.