तैपेई (तैवान) : गेल्या दोन महिन्यांपासून कुणालाही न दिसलेले चीनचे संरक्षणमंत्री ली शांगफू यांची अखेर पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी कुणाची नेमणूक करणार, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी यामुळे क्षी जिनपिंग यांच्या प्रशासनात सर्व आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा पद्धतीने ‘बेपत्ता’ झाल्यानंतर हकालपट्टी झालेले ते दुसरे उच्चपदस्थ आहेत.

हेही वाचा >>> “त्यांनी आम्हाला चांगली वागणूक दिली, पण…’, हमासच्या तावडीतून सुटका झालेल्या महिलेनं सांगितला भयावह घटनाक्रम

मार्चमध्ये जिनपिंग यांनी केलेल्या मंत्रिमंडळ फेरबदलांत शांगफू यांना संरक्षणमंत्री करण्यात आले होते. देशातील या दुसऱ्या क्रमांकाच्या मंत्रीपदावर पोहोचलेले शांगफू २९ ऑगस्टला एका भाषणात दिसले होते. अशाच पद्धतीने काही महिन्यांपूर्वी तत्कालीन परराष्ट्रमंत्री चिन गांगदेखील बेपत्ता झाले होते. मंगळवारी चीनच्या सरकारी सीसीटीव्ही वाहिनीने शांगफू आणि चिन गांग यांना पदावरून हटविल्याचे जाहीर केले. यामुळे दोघांच्याही राजकीय कारकीर्दीचा अंत झाल्याचे स्पष्ट झाले असले तरी त्यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी होणार का, याबाबत काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शांगफू आणि गांग यांचे गायब होणे आणि त्यानंतर झालेली हकालपट्टी याचा संबंध चीनच्या परराष्ट्र धोरणांशी जोडला जात असून जिनपिंग यांच्याबाबत मंत्रिमंडळात नाराजी असल्याचीही चर्चा रंगली आहे. जिनपिंग यांना अन्य कशाहीपेक्षा निष्ठा महत्त्वाची असल्याचे मानले जाते. त्यांनी अलीकडेच काही उच्चपदस्थांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून चौकशी सुरू केली होती. प्रशासनातील विरोधकांना संपविण्यासाठी जिनपिंग यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. शिवाय शांगफू यांच्यावर रशियाकडून अनधिकृतरीत्या शस्त्रास्त्र खरेदी केल्याचा ठपका ठेवून अमेरिकेने त्यांच्यावर प्रवेशबंदी लादली होती. याबाबत अर्थातच चीन सरकारने पूर्णत: मौन आहे.