China On US Tariff War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणलेल्या टॅरिफ (आयात शुल्क) धोरणाचा फटका जगभरातील अनेक देशांना बसल्याचं पाहायला मिळालं. ट्रम्प यांच्या टॅरिफच्या मुद्यांवरून गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. ट्रम्प यांनी २ एप्रिल रोजी ७० देशांवर आयातशुल्क लादण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यानंतर मोठा गदारोळ पाहायला मिळाला. यानंतर अखेर ट्रम्प यांनी काहीशी माघार घेत बहुसंख्य देशांवरील आयातशुल्काला ९० दिवसांची स्थगिती दिली. पण या निर्णयामधून चीनला वगळलं होतं.
त्यानंतर चीननेही अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. त्यामुळे अमेरिका आणि चीनमध्ये ‘टॅरिफ वॉर’ चांगलंच भडकल्याचं पाहायला मिळालं. ट्रम्प प्रशासनाने आधी चीनवर ३४ टक्के आयातशुल्क लादलं होतं, त्यानंतर चीननेही जशास तसं प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर अमेरिकेने पुन्हा चीनवर १०४ टक्के आयातशुल्क लादलं. त्यावर चीननेही अमेरिकेवर ८४ टक्के आयातशुल्क लादलं. त्यानंतर पुन्हा अमेरिकेने चीनवरील आयातशुल्क थेट १४५ टक्क्यांपर्यंत वाढवलं. त्यानंतर पुन्हा चीननेही अमेरिकन वस्तूंवरील आयातशुल्क १२५ टक्क्यांपर्यंत वाढवलं होतं.
मागील काही दिवसांपासून ‘टॅरिफ वॉर’ शांत झाल्याचं दिसून येत असतानाच आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे. अमेरिकेने आयातशुल्क (टॅरिफ) धोरणाबाबत चर्चा करण्यासाठी चीनशी संपर्क साधला असल्याचा दावा चीनच्या काही सरकारी माध्यमांनी केला आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. अमेरिकेला आता चीनबरोबर टॅरिफ संदर्भात चर्चा करायची असल्याचा दावा चीनच्या सरकारी माध्यमांशी संलग्न असलेल्या एका सोशल मीडिया अकाउंटवरून करण्यात आला आहे.
आयातशुल्कच्या संदर्भात अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या चिनी समकक्षांशी चर्चा केल्याचा दावा बीजिंगच्या युयुआन टँटियन यांनी त्यांच्या अधिकृत वेइबो सोशल मीडिया अकाउंटवर सूत्रांचा हवाला देऊन पोस्ट करत हा दावा केला आहे. म्हटलं आहे की, वॉशिंग्टन अनेक माध्यमांद्वारे टॅरिफवरील चर्चेसाठी चीनशी सक्रियपणे संपर्क साधत आहे. वाटाघाटीच्या दृष्टिकोनातून अमेरिका सध्या अधिक चिंताग्रस्त पक्ष आहे, असं वेइबोवर म्हटलं असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.