China on US Tariff on India : भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे अमेरिकेने भारतावर २५ टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लागू केलं आहे. तसेचअमेरिकेने भारताला २१ दिवसांनी आणखी २५ टक्के आयात शुल्क लागू करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, चीनने अमेरिकेच्या या धोरणाबद्दल ‘कराचा गैरवापर’ अशी टिप्पणी केली आहे. तसेच चीनने संयम बाळगण्याचं आवाहन देखील केलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताविरोधात आक्रमक झाले आहेत. याबद्दल विचारल्यावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकून म्हणाले “कराच्या गैरवापराला चीन ठामपणे व सातत्याने विरोध करत आला आहे. आमचा विरोध यापुढेही कायम असेल.”
अमेरिका तिच्या जागतिक भागीदारांप्रती आक्रमक भूमिका घेत असून चीनने त्याबद्दल अस्वस्थता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे चीनही रशियाकडून तेल खरेदी करत आहे. परंतु, अमेरिकेने चीनवर दंडात्मक कारवाई केलेली नाही.
अमेरिकेने भारतावर लादलेलं २५ टक्के आयात शुल्क ७ ऑगस्टपासून लागू झालं आहे. तर, २१ दिवसांनी उर्वरित ५० टक्के आयात शुल्क लागू केलं जाईल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. या दिवसांमध्ये उभय देशांमध्ये वाटाघाटी झाल्या, ट्रम्प यांच्या अपेक्षेप्रमाणे व्यापार करार झाला तर आयात शुल्कात बदल होऊ शकतो.
ट्रम्प यांच्या निर्णयाचा रशियाकडूनही निषेध
दुसऱ्या बाजूला रशियाने देखील भारताची बाजू घेतली आहे. वॉशिंग्टनच्या कर आकारणीचा रशियाने निषेध नोंदवला आहे. मॉस्कोने म्हटलं आहे की सार्वभौम देशांना त्यांचे स्वतःचे व्यापारी भागीदार निवडण्याचा अधिकार आहे.
भारताचं सडेतोड उत्तर
दरम्यान, ट्रम्प यांनी अतिरिक्त २५ टक्के आयात शुल्काची घोषणा केल्यानंतर भारताने अमेरिकेला ठणकावलं आहे. अमेरिकेचा हा निर्णय अत्यंत दुर्दैवी, अवास्तव आणि अन्यायकारक असल्याची टिप्पणी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एक्सवर (ट्विटर) केली आहे. जयस्वाल म्हणाले, ट्रम्प यांची ही कृती अन्यायकारक व अवास्तव आहे. भारत आपल्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक सर्व पावलं उचलेल.”
पाठोपाठ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांच्या अरेरावीला संयमी उत्तर दिलं आहे. मोदी म्हणाले, “भारत आपल्या शेतकऱ्यांच्या, पशूपालकांच्या, मच्छिमारांच्या हिंतांबाबत कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नाही.” मोदी यांची ही टिप्पणी थेट वॉशिंग्टनसाठी संदेश असल्याचं मानलं जात आहे.