G20 Meeting In Kashmir : श्रीनगर येथे २२ ते २४ मे दरम्यान तिसरी G20 पर्यटन कार्यगटाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मात्र, या बैठकीला हजर राहण्यास चीनने नकार दिला आहे. वादग्रस्त भागात आम्ही बैठकीला येणार नसल्याची भूमिका चीनने जाहीर केली आहे. तसंच, तुर्की आणि सैदी अरेबियानेही या बैठकीसाठी नोंदणी केलेली नाही.

“वादग्रस्त भागात कोणत्याही स्वरूपात जी -20 बैठक घेण्यास चीनचा ठाम विरोध आहे. अशा बैठकांना आम्ही उपस्थित राहणार नाही,” अशी ठाम भूमिका चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी शुक्रवारी मांडली. तर, “स्वतःच्या हद्दीत बैठका घेण्यास भारत स्वतंत्र आहे, असं प्रत्युत्तर भारताने चीनला दिलं आहे. “चीनसोबतच्या चांगल्या संबंधांसाठी आपल्या सीमेवर शांतता आवश्यक आहे”, असंही भारताने सांगितलं.

तिसरी G20 पर्यटन कार्यगटाची बैठक २२ ते २४ मे रोजी श्रीनगरमध्ये होणार असून येथे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. २०१९ मध्ये जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढून टाकल्यानंतर त्यांचे दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन करण्यात आले. त्यानंतरचा हा सर्वांत मोठा आंतररष्ट्रीय कार्यक्रम होणार आहे.

श्रीनगरमध्ये होणाऱ्या या बैठकीला G20 देशांतील सुमारे ६० प्रतिनिधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यापूर्वी १०० हून अधिक प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. परंतु, तुर्की आणि सौदी अरेबियानेही या कार्यक्रमासाठी नोंदणी केलेली नाही. तर, चीननेही या बैठकीला हजर राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अशाप्रकारे अनेक देश या बैठकीला येणार नसल्याने ६० देशांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित राहतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रीनगरमध्ये कडेकोट सुरक्षा

श्रीनगर अभूतपूर्व सुरक्षा ठेवण्यात आली आहे. सागरी कमांडो आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स (NSG) येथे तैनात करण्यात आले आहेत.शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर (SKICC) च्या आजूबाजूच्या दल सरोवराची सुरक्षा मरीन यांनी हाती घेतली आहे. एनएसजी कमांडो पोलीस आणि निमलष्करी दलांसोबत क्षेत्र वर्चस्वाचा सराव करत आहेत. गुरुवारी एनएसजीने लाल चौकात झडती घेतली. निमलष्करी दलाच्या तुकड्या हाऊसबोटमध्ये घुसून झडती घेताना दिसल्या.