Afghanistan Included In China-Pakistan Economic Corridor: ऑपरेशान सिंदूर दरम्यान भारतासोबत उभ्या राहिलेल्या तालिबान सरकारला आता चीन आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी काही दिवसांपूर्वी तालिबानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्याशी अफगाणिस्तानच्या तालिबान प्रशासनाशी भारतातर्फे पहिली अधिकृत मंत्रीस्तरीय चर्चा केली होती. यानंतर चीनने पाकिस्तान आणि तालिबान यांच्यात बैठक आयोजित करण्यासाठी वेगाने हालचाल केली.

बुधवारी चीन-पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने एक मोठा निर्णय घेतला असून, तिन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर अफगाणिस्तानपर्यंत विस्तारित करण्यास संयुक्तपणे सहमती दर्शविली आहे. चीनची राजधानी बीजिंगमध्ये झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली.

या बैठकीला पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक दार, चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी आणि अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी उपस्थित होते. दरम्यान भारत चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरला सातत्याने विरोध केला आहे. कारण हा कॉरिडॉर पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधून जातो.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी बीजिंगमधील पत्रकार परिषदेत चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार आणि अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्यातील बैठक अनौपचारिक असल्याचे म्हटले आहे.

या त्रिपक्षीय बैठकीबद्दल, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, चीन अफगाणिस्तान आणि पाकिस्तानला त्यांच्या सार्वभौमत्वाचे, सुरक्षिततेचे आणि राष्ट्रीय प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी पाठिंबा देत आहे. याबाबत पीटीआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.

चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरला भारताचा विरोध

चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरला प्रकल्पात तिसऱ्या देशाच्या सहभागाला प्रोत्साहन दिल्याबद्दल भारताने यापूर्वी चीन आणि पाकिस्तानचा तीव्र निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने २०२२ मध्ये म्हटले होते की, “आम्ही तथाकथित चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर प्रकल्पांमध्ये तिसऱ्या देशांच्या प्रस्तावित सहभागाला प्रोत्साहन देणारे अहवाल पाहिले आहेत. कोणत्याही पक्षाने केलेली अशी कोणतीही कृती भारताच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे थेट उल्लंघन करते. भारत तथाकथित चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरला प्रकल्पाला तीव्र आणि सातत्याने विरोध करतो, जो पाकिस्तानने बेकायदेशीरपणे व्यापलेल्या भारतीय हद्दीतून जातो.”

दरम्यान, चीन आणि पाकिस्तानने या प्रकल्पात अफगाणिस्तानचा समावेश अशा वेळी केला आहे जेव्हा तालिबान सरकारने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा दिला आहे. या सर्व घडामोडींदरम्यान भारत आणि तालिबान यांच्यात पहिला राजकीय संवाद झाला. भारताचे चीन आणि पाकिस्तानशी आधीच सीमा वाद आहेत, त्यामुळे अफगाणिस्तानचे या दोन्ही देशांशी ऐक्य भारतासाठी धोकादायक ठरू शकते.