पीटीआय, नवी दिल्ली
‘चीन, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील समान हेतूंची शक्यता पाहता त्याचा भारताच्या स्थैर्यावर आणि सुरक्षेवर गंभीर परिणाम होऊ शकतो,’ असा इशारा संरक्षण दलप्रमुख जनरल अनिल चौहान यांनी मंगळवारी दिला. नवी दिल्लीतील ‘ऑब्झर्व्हर रीसर्च फाउंडेशन’च्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.
बांगलादेशमध्ये पंतप्रधान शेख हसीना यांच्या गच्छंतीनंतर भारत आणि बांगलादेशमधील संबंध दुरावलेले आहेत. शेख हसीना यांनी भारतामध्ये आश्रय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर जनरल चौहान यांनी मतप्रदर्शन केले. चीन आणि पाकिस्तान यांच्यातील मैत्रीबद्दल सांगताना ते म्हणाले, ‘पाकिस्तानला गेल्या पाच वर्षांत जवळपास ७० ते ८० टक्के शस्त्रे आणि संरक्षण साहित्य चीनकडून प्राप्त झाले आहे. चिनी लष्कराकडे पाकिस्तानमध्ये व्यावसायिक हितसंबंध आहेत.’
‘भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरू असताना उत्तर सीमेवर चीनकडून कुठल्याही प्रकारची आगळिक झाली नाही,’ असे नमूद करून जनरल चौहान म्हणाले, ‘हिंदी महासागर क्षेत्रातील देशांच्या ढासळलेल्या आर्थिक स्थितीमुळे बाह्यशक्तींचा प्रभाव या देशांमध्ये वाढू शकतो. भारतासाठी ही बाब संवेदनशील ठरू शकते. चीन-पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात समान हितसंबंध तयार होण्याची शक्यता आहे. त्याचा भारताच्या स्थैर्यावर आणि सुरक्षास्थितीवर परिणाम होऊ शकतो.’
भारत आणि पाकिस्तानदरम्यान ७ ते १० मे या चार दिवसांत झालेल्या लष्करी संघर्षाबाबत जनरल चौहान यांनी सांगितले की, ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान लष्कर, नौदल आणि हवाई दलामध्ये उत्तम समन्वय दिसला. ते म्हणाले, ‘अण्वस्त्रांची धमकी देऊन ब्लॅकमेल करणे खपवून घेणार नाही, असे भारताने स्पष्टपणे म्हटले आहे. मला वाटते, की ‘ऑपरेशन सिंदूर’ हे दोन अण्वस्त्रसज्ज देशांमधील संघर्षाचे एकमेव उदाहरण आहे. पारंपरिक युद्धपद्धतीमध्ये विस्तारासाठी नक्कीच जागा असून त्यात सायबर आणि विद्याुतचुंबकीय युद्धपद्धतींचाही समावेश होऊ शकतो, असे जनरल चौहान यांनी सांगितले.
‘संपूर्ण अभेद्या हवाई सुरक्षा कवच नाही’
दीर्घ पल्ल्याच्या अस्त्रांचे आणि दीर्घ पल्ल्यांच्या अचूक हल्ल्यांचे आव्हान लष्करासमोर असल्याचे जनरल चौहान यांनी नमूद केले. ते म्हणाले, ‘बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे, क्रूज क्षेपणास्त्रे आणि खूप मोठ्या प्रमाणावर ड्रोन हल्ले झाले, तर त्याविरोधात संपूर्ण आणि अभेद्या हवाई सुरक्षा कवच नाही. त्यामुळे लष्कराच्या दृष्टिकोनातून आव्हानांचा विचार करता चोवीस तास आणि ३६५ दिवस अतिशय उच्चकोटीतील युद्धसज्जता बाळगावी लागेल. जुन्या आणि नव्या युद्धपद्धतींमध्ये कायम सज्ज राहावे लागेल.’