गेल्या सुमारे तीन दशकांपासून चीनमध्ये एकापेक्षा जास्त अपत्याला जन्म देण्यावर असलेले निर्बंध अखेर गुरुवारी रद्द करण्यात आले. आता चीनमध्ये एका दाम्पत्याला दोन अपत्यांना जन्म देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. चीनने घेतलेल्या या निर्णयाचे येत्या काही वर्षांमध्ये जागतिक परिणाम होण्याची शक्यता अभ्यासकांनी वर्तविली.
चीनमधील अधिकृत वृत्तसंस्था झिनुआने केलेल्या ट्विटनुसार, चीनमध्ये केवळ एकच अपत्य जन्माला घालण्यासंबंधीचे धोरण रद्द करण्यात आले आहे. यापुढे एका दाम्पत्याला दोन अपत्यांना जन्म देण्याची परवानगी देण्यात आली आहे. चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाची चार दिवसांची प्रदीर्घ बैठक गुरुवारी संपली. या बैठकीमध्ये पुढील पाच वर्षांसाठी कुटुंब नियोजनासंदर्भातील निर्णय घेण्यात आला.
चीनमधील अनेक उजव्या विचारसरणीच्या लोकांनी गेल्या अनेक वर्षांपासून या धोरणावर टीका केली होती. या धोरणामुळे अनेक दाम्पत्यांना गर्भपातालाही सामोरे जावे लागले होते. त्यामुळे यावर पुनर्विचार करण्याचा निर्णय सत्ताधारी पक्षाने घेतला.