चीनचा नवा सनवे तायहूलाइट हा महासंगणक जगात सर्वात वेगवान व कार्यक्षम ठरला आहे. तो ९३ पद्म (पद्म-१ वर पंधरा शून्य) आकडेमोडी सेकंदाला करू शकतो. सनवे तायहूलाइट संगणक नॅशनल रीसर्च सेंटर ऑफ पॅरलल कम्प्युटर इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी या संस्थेने तयार केला असून त्यात चीननिर्मित संस्कारक वापरले आहेत. चीनमधील नॅशनल सुपरकॉम्प्युटिंग सेंटर या संस्थेचा तियानहे २ हा महासंगणक गेली सहा वर्षे टॉप ५०० यादीत पहिल्या क्रमांकावर होता. वर्षांतून दोनदा वेगवान महासंगणकाची यादी जाहीर केली जाते. सनवे तायहूलाइट हा संगणक तियानहे २ पेक्षा दुप्पट वेगवान व तिप्पट कार्यक्षम आहे. तियानहे संगणक सेकंदाला ३३.८६ पद्म गणने करीत होता. तो आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. टायटन हा क्रे एक्स ४० संगणक अमेरिकेच्या ऊर्जा खात्याच्या ओकरिज नॅशनल लॅबोरेटरीत बसवला असून त्याचा वेग सेकंदावा १७.५९ पद्म इतका आहे. तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयबीएम ब्लू जीन म्हणजेच सिक्वोया हा लॉरेन्स लिव्हरमोर नॅशनल लॅबोरेटरीतील महासंगणक चौथ्या क्रमांकावर असून जपानचा फुजित्सु येथील के महासंगणक पाचव्या क्रमांकावर आहे. अमेरिकेचा मीरा, ट्रिनिटी, युरोपचा पिझजेन्ट. जर्मनीचा हॅझेल हेन, सौदी अरेबियाचा शाहीन २ हे महासंगणक पहिल्या दहामध्ये आहे. चीनकडे १६७ तर अमेरिकेत १६५ महासंगणक आहेत. यादीतील पहिले दोनही महासंगणक चीनचे आहेत.