scorecardresearch

चीन-अमेरिकेकडून परस्परांच्या हवाई उड्डाणांवर निर्बंध

चीनने अमेरिकेत येणाऱ्या विमानांच्या फेऱ्या स्थगित केल्याने आम्ही येथून चीनला जाणाऱ्या विमानांची उड्डाणे स्थगित केली आहेत.

Plane
प्रातिनिधिक छायाचित्र

अमेरिकेला जाणाऱ्या काही विमानांच्या फेऱ्या चीनने करोना निर्बंधांचे कारण देत स्थगित केल्यानंतर अमेरिकेनेही शुक्रवारी चीनच्या चार विमान कंपन्याच्या अमेरिकेतून चीनला जाणाऱ्या ४४ फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

 याबाबत अमेरिकी सरकारने म्हटले आहे की, चीनने अमेरिकेत येणाऱ्या विमानांच्या फेऱ्या स्थगित केल्याने आम्ही येथून चीनला जाणाऱ्या विमानांची उड्डाणे स्थगित केली आहेत.  विमानांची ही उड्डाणे ३० जानेवारीपासून स्थगित होणार आहेत. त्यानुसार झियामेन एअरलाईन्सची लॉस एन्जेलिस ते झियामेन उड्डाणे २९ मार्चपासूनच बंद होतील, असे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे झियामेन, एअर चायना, चायना साऊथ एअरलाइन्स आणि चायना ईस्टर्न एअरलाइन्सची काही उड्डाणे स्थगित होणार आहेत.  

चीनने ३१ डिसेंबरपासून युनायटेड एअरलाइन्सची २०, अमेरिकन एअरलाइन्सची १० आणि डेल्टा एअरलाइन्सची १४ विमान उड्डाणे स्थगित केली आहेत. या विमानांतून आलेल्या काही प्रवाशांच्या करोना चाचण्या होकारात्मक आल्याने हा निर्णय घेतल्याचे चिनी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यानंतर गुरुवारी चीनने अमेरिकेतून येणाऱ्या आणखी काही विमान उड्डाणांना स्थगिती दिली होती.

चीनचा दावा

वॉशिंग्टनमधील चिनी दुतावासाचे प्रवक्ते ली पेंगीऊ म्हणाले की, चीनमध्ये आंतरराष्ट्रीय विमानसेवांसाठीचे धोरण हे चिनी विमान कंपन्या आणि इतर देशांच्या विमान कंपन्यांसाठी समान आहे. ते न्याय्य, खुले आणि पारदर्शक आहे. याउलट अमेरिकेचे धोरण हे समर्थनीय नाही. त्यांनी चिनी कंपन्यांच्या नियमित प्रवासी सेवांवर निर्बंध आणून अडथळे आणू नयेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: China us restrictions on reciprocal flights akp

ताज्या बातम्या