तैवानच्या मुद्द्यावरून चीन आणि अमेरिका पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर उभे ठाकल्याचं चित्र उभं राहिलं होतं. चीन तैवानवर हक्क सांगताना अधिकच आक्रमक झाल्याचं गेल्या काही दिवसांमध्य दिसून आलं होतं. या पार्श्वभूमीवर अमेरिकेकडून या वादात उडी घेत तैवानला संरक्षण देत असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. तैवानला चीनच्या विरोधात सर्व मदत करण्याचं आश्वासन अमेरिकेकडून देण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि चीन या दोन्ही लष्करी आणि आर्थिक महासत्तांमधील संबंध तणावपूर्ण बनले होते. त्यामुळे तैवानच्या मुद्द्यावरून या दोन देशांमध्ये युद्ध होण्याची शक्यता देखील निर्माण झाली होती. मात्र, आता चीननं घेतलेल्या भूमिकेमुळे हा तणाव निवळण्याची शक्यता आहे.

मतभेद मिटवण्यासाठी पुढाकार

खरंतर तैवानचा मुद्दा उपस्थित होण्याच्याही आधीपासून अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये नेहमीच स्पर्धा आणि वाद दिसून आला आहे. हे दोन्ही देश अण्वस्त्रधारी असल्यामुळे याविषयी जागतिक पातळीवर देखील चिंता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, आता चीनकडूनच मतभेद मिटवण्यासाठी तयार असल्याचं स्पष्ट करण्यात आल्यामुळे हा भारतीय उपखंडातील शांततेसाठी देखील महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.

चीनचे अमेरिकेतील राजदूत किन गँग यांनी अमेरिकेसंदर्भातील राष्ट्रीय कमिटीसमोर वाचून दाखवलेल्या पत्रामध्ये राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिकेसोबतचे संबंध सुधारण्याविषयीचे सूतोवाच केले आहेत. “अमेरिकेसोबत असलेले मतभेद कमी करण्यासाठी आणि द्विपक्षीय संबंध नियोजनबद्ध पद्धतीने सुधारण्यासाठी चीन तयार आहे”, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. प्रादेशिक आणि जागतिक वादाच्या मुद्द्यांवर सामंजस्य प्रस्थापित करण्यासाठी चीनकडून प्रयत्न करण्यात येतील, असं देखील या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

भेटीची तारीख अद्याप निश्चित नाही

दोन्ही देशांचे प्रमुख अर्थात शी जिनपिंग आणि जो बायडेन यांची लवकरच भेट होणार आहे. मात्र, ही भेट नेमकी कधी होईल, हे अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. पुढील आठवड्यात ही भेट होणार असल्याचं सांगण्यात येत असून शी जिनपिंग यांच्या पत्रामुळे या भेटीसाठी चांगली पार्श्वभूमी तयार झाल्याचं बोललं जात आहे.