scorecardresearch

“चीनच्या ५ युद्धनौका आणि १७ लढाऊ विमानं…”, तैवानच्या संरक्षण मंत्रालयाचा गंभीर दावा; हल्ल्यासाठी चीन सज्ज?

चीनची लढाऊ विमानं आपल्या हवाई हद्दीत घिरट्या घालत असल्याचा तैवानचा दावा!

“चीनच्या ५ युद्धनौका आणि १७ लढाऊ विमानं…”, तैवानच्या संरक्षण मंत्रालयाचा गंभीर दावा; हल्ल्यासाठी चीन सज्ज?
मागील बऱ्याच काळापासून तैवान आणि चीनमध्ये संघर्ष सुरु आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून चीन आणि तैवानमधील संबंध प्रचंड ताणले गेले असून चीनने जाहीररीत्या तैवानवर दावा सांगितला आहे. त्यात अमेरिकन संसद सदस्यांच्या तैवान दौऱ्यावरून चीनने आगपाखड केलेली असतानाच आता तैवानच्या हवाई हद्दीमध्ये चीनी लढाऊ विमानं घिरट्या घालू लागली आहेत. खुद्द चीनने देखील या वृत्ताला दुजोरा दिलेला असतानाच आता तैवानच्या संरक्षणमंत्र्यांनी देशाच्या हवाई सीमेवर चीनी हवाई दलाच्या हालचालींची सविस्तर माहिती दिली आहे. तसेच, अमेरिकी संसद सदस्यांच्या दौऱ्यानंतर या हालचाली वाढल्याचं देखील तैवानकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे चीन तैवानवर हल्ला करण्यासाठी सज्ज असल्याचं बोललं जात आहे.

मंगळवारी चीनकडून तैवानच्या हवाई हद्दीजवळ वायुदलाच्या कवायती केल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर आता तैवानच्या संरक्षण मंत्रालयाकडून त्यावर भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. “तैवानच्या हद्दीमध्ये चीनी लष्कराच्या हालचालींची नोंद करण्यता आली आहे. तैवानच्या लष्कराकडून बिजिंगच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आलं आहे”, असं तैवानच्या संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

“५ चीनी युद्धनौका आणि १७ लढाऊ विमाने तैवानच्या आसपासच्या भागामध्ये असल्याची नोंद करण्यात आली आहे. तैवानच्या लष्कराकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे”, असं देखील देशाच्या संरक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

चीन आणि तैवानमध्ये नेमका वाद काय?

गेल्या अनेक वर्षांपासून चीनकडून तैवानवर दावा सांगितला जात आहे. १९४९मध्ये चीनमध्ये झालेल्या अंतर्गत यादवीनंतर चीनच्या मुख्य भूमीवर चीनमधील साम्यवादी शासनानं सरकार स्थापन केलं, तर विरोधी पक्षाच्या गटानं तैवानमध्ये बस्तान बसवलं. मात्र, २०१९पासून चीननं सातत्याने तैवानच्या हद्दीमध्ये लष्करी हालचाली सुरू केल्या. तैवान हा चीनचाच भाग आहे, असं म्हणत तैवानला चीनमध्ये सामील होण्यासाठी कम्युनिस्ट सरकारकडून दबाव टाकला जाऊ लागला. जगातील अनेक देशांनी चीनच्या या भूमिकेला विरोध केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.