Chirag Paswan On Bihar govt formation : बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएला २०२ जागा जिंकता आल्या, तर महाआघाडीला फक्त ३५ जागा मिळवता आल्या आहेत. एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर आता बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचं सरकार स्थापन होणार आहे. पण बिहारच्या नवीन सरकारचा शपथविधी सोहळा कधी होणार? बिहारचं मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. यावर आता केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी महत्वाची माहिती सांगितली आहे.
बिहार विधानसभेचा कार्यकाळ २२ नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे राज्यातील सरकार स्थापनेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भाजपा आणि नितीश कुमार यांचा जदयू हे पक्ष बिहारमध्ये सर्वात मोठे पक्ष म्हणून उदयास आले आहेत. त्यामुळे नितीश कुमार हेच पुन्हा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार का? की मुख्यमंत्री पदी दुसरी कोणाची वर्णी लागणार? यावर विविध चर्चा रंगताना पाहायला मिळत आहेत.
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी यासंदर्भात बोलताना म्हटलं की, “राज्यात नवीन एनडीए सरकार २२ नोव्हेंबरपूर्वी स्थापन होईल. मी वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांशी बोलेन आणि आज किंवा उद्यापर्यंत आमची ब्लू प्रिंट तयार होईल. मात्र, तरीही आपल्याला २२ नोव्हेंबरपूर्वी सरकार स्थापन करायचं आहे आणि ते केलं जाईल. सरकार स्थापनेबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल.” या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
उपेंद्र कुशवाह काय म्हणाले?
राष्ट्रीय लोक मोर्चाचे नेते उपेंद्र कुशवाह यांनीही सरकार स्थापनेबाबत प्रतिक्रिया दिली, ते म्हणाले की, “पुढील दोन ते चार दिवसांत गोष्टी स्पष्ट होतील. त्यामुळे लोकांना आणखी थोडी वाट पहावी लागेल. पण एनडीए सरकार स्थापनेची प्रक्रिया दोन ते तीन दिवसांत सुरू होईल. सर्व विजयी आमदार सध्या त्यांच्या मतदारसंघात आहेत, ते पटणामध्ये पोहोचले की पुढील सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू होईल.”
बिहार निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?
भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्त्वाखालील एनडीएने २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी केली. बिहार निवडणुकीचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले. यामध्ये एनडीएने २४३ पैकी २०२ जागा जिंकत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली. एनडीएने जिंकलेल्या २०२ जागांपैकी भाजपाला ८९ जागांवर विजय मिळाला, तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने ८५ जागा जिंकल्या. या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी १०१ जागा लढवल्या होत्या. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने (रामविलास) लढवलेल्या २९ जागांपैकी १९ जागा जिंकल्या, जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्थानी अवाम मोर्चाने ५ जागा जिंकल्या तर राष्ट्र लोक मोर्चाने ४ जागा जिंकल्या. तसेच महाआघाडीला अवघ्या ३५ जागांवर समाधान मानावं लागलं.
