Kinjarapu Ram Mohan Naidu On Air India Plane Crash AAIB Report: अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाल्याची घटना महिन्यापूर्वी (१२ जून रोजी) घडली होती. या अपघातात २६० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. या अपघातासंदर्भातील नुकताच भारताच्या विमान अपघात तपास ब्युरोचा (विमान दुर्घटनांशी संबंधित तपास करणारी संस्था-AAIB) अपघाताच्या कारणांबाबतचा एक अहवाल समोर आला आहे. या अहवालात एएआयबीने म्हटलं की, ‘१२ जून रोजी अहमदाबादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतलेल्या विमानातील इंधन नियंत्रण स्विच बंद झालं होतं. त्यानंतर काही सेकंदाने ते पुन्हा चालू करण्यात आलं. मात्र, तोपर्यंत विमानाची उंची खूपच खाली आली होती.’
तसेच या अहवालात विमानातील वैमानिकांचा संवादही समोर आला होता. यामध्ये एका वैमानिकाने दुसऱ्या वैमानिकाला विचारलं की, “तू इंधन पुरवठा का बंद केलास?” तर दुसऱ्या वैमानिकाचे उत्तर होते की, ‘मी काहीही केलेलं नाही’ असा संवाद या अहवालातून समोर आला आहे. या अहवालानंतर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. दरम्यान, यावर आता अखेर केंद्र सरकारने स्पष्टीकरण देत या अपघाताच्या घटनेबाबत अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत न पोहोचण्याचं आवाहन केलं आहे.
केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी सांगितलं की, “या अपघाताच्या घटनेचा समोर आलेला अहवाल हा केवळ प्राथमिक आहे. अंतिम निष्कर्ष जाहीर होईपर्यंत आताच निष्कर्षांपर्यंत पोहोचू नका. फक्त वैमानिकांच्या संभाषणावरून निष्कर्ष काढण्यात येऊ नये”, असं आवाहन मंत्री राम मोहन नायडू यांनी माध्यमांना आणि जनतेला केलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
“तसेच अद्याप अनेक तांत्रिक बाबींचं विश्लेषण बाकी आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालय या अहवालाचं सखोल विश्लेषण करत आहे. आपण कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू नये. अंतिम अहवाल आल्यानंतरच आपण ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो”, असं मंत्री राम मोहन नायडू यांनी सांगितलं आहे.
प्राथमिक तपास अहवालातील महत्त्वाचे मुद्दे:
-दोन्ही इंजिनमधील इंधन पुरवठा हवेतच बंद झाला.
-कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरने वैमानिकांमधील विसंवाद टिपला.
-इंजिन पूर्वस्थितीत आणण्याचा प्रयत्न पुर्णत्वास येऊ शकला नाही.
-मेडे कॉल विमान कोसळण्याच्या काही क्षण आधी दिला गेला.
-अपघातानंतर विमानाचे अवशेष एक हजार फुटांवर विखुरले होते.
-सदर विमान उड्डाणयोग्य होते, इंधन नियंत्रण समस्या आधी नोंदवली गेली नव्हती.
एएआयबीच्या प्राथमिक अहवालातून काय माहिती समोर आली?
एएआयबीच्या प्राथमिक तपासानुसार, एअर इंडियाचे विमान एआय-१७१ ने १२ जून रोजी अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच इंजिनला इंधन पुरवठा करणारे स्विचेस रन (RUN) मोडवरून कटऑफ (CUTOFF) मोडवर गेले होते. दरम्यान कॉकपिटमध्ये एका वैमानिकाने दुसऱ्या वैमानिकाला विचारले की, “तू इंधन पुरवठा का बंद केलास?” तर दुसऱ्या वैमानिकाचे उत्तर होते की, ‘मी काहीही केलेले नाही’ हा संवादही अहवालातून समोर आला आहे. काही सेकंद इंधन कटऑफची स्थिती राहिल्यानंतर ती बदलून पूर्ववत करण्यात आली. मात्र तोपर्यंत विमानाची उंची घटल्यामुळे सुरक्षित पातळी गाठण्यासाठी वेळ मिळाला नाही. टेकऑफ आणि क्रॅश दरम्यान सुमारे ३० सेकंद विमान हवेत होते, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.