Civil service topper arrested for taking Rs 15000 bribe : ओडिशा दक्षता विभागाने (Odisha Vigilance) शुक्रवारी संबलपूर जिल्ह्यातील बामरा येथील तहसीलदार, अश्विनी कुमार पांडा यांना कथितपणे १५,००० रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे, पांडा हे राज्य नागरी सेवा परीक्षेतील (State Civil Service Exam) टॉपर आहेत.

दक्षता विभागाने जारी केलेल्या निवेदनानुसार, शेत जमिनीचे रुपांतरण होमस्टेड जमिनीमध्ये करण्यासाठी या अधिकार्‍याने तक्रारदराकडून लाच घेतली. दक्षता विभागातील अधिकार्‍यांनी महिती दिली की, तक्रादाराने एक महिन्यापूर्वी तहसीलदार कार्यालयात जमिनीचे रुपांतर करण्यासाठी अर्ज दाखल केला होता .

दक्षता विभागाने जारी केलेल्या निवेदनानुसार, पांडाने तक्रारदाराच्या बाजूने जमिनीचे रुपांतरण आणि रेकॉर्ड ऑफ राईट (RoR) जारी करण्यासाठी २०,००० रुपयांची लाच मागितली होती. जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात लाच देणे शक्य नसल्याचे सांगितल्यानंतर पांडाने लाचेची रक्कम १५,००० रुपयांपर्यंत कमी केली आणि त्याशिवाय रुपांतरणांची परवानगी देणार नाही अशी धमकी देखील दिली.

यानंतर तक्रारदाराने दक्षता विभागातील अधिकार्‍यांकडे धाव घेतली, ज्यानंतर शुक्रवारी सापळा लावण्यात आला. त्यानंतर दक्षता विभागाने तहसीलदाराला कथितपणे तक्रारदाराकडून ड्रायव्हरच्या माध्यमातून लाच घेताना त्याच्या कार्यालयातून पकडले. लाच म्हणून देण्यात आलेली सर्व रक्कम जप्त करण्यात आली आहे, असेही दक्षता विभागाने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.

सापळा लावण्यात आल्यानंतर लगेचच त्याच वेळी पांडा यांच्या भुवनेश्व येथील निवासस्थानी शोध घेण्यात आला, येथे त्यांचे कुटुंब राहते. तसेच पीडब्लूडी आयबी जेथे तहसीलदार राहातात तेथेही शोध घेण्यात आला.

घरातून मोठी रक्कम जप्त

या शोध मोहिमेदरम्यान दक्षता विभागाला भुवनेश्वर येथील घरात ४,७३,००० रुपये रोकड आढळून आली. पांडा याचा चालक पी प्रवीण कुमार याला देखील दक्षता विभागाने भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणात पुढील तपास केला जात आहे.

मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक केलेल्या पांडा (३२) याने २०१९ मध्ये ओडिशा सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला होता. यानंतर तो डिसेंबर २०२१ मध्ये ज्युनियर ओडिशा अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस (ओएएस) अधिकाऱ्यांसाठी असलेल्या ट्रेनिंग रिझर्व्ह ऑफिसर (टीआरओ) म्हणून सरकारी सेवेत प्रवेश केला. त्यानंतर पांडा याने मयूरभंज जिल्ह्यातील शामाखुंटा येथे तहसीलदार म्हणून काम पाहिले, त्यानंतर त्याची बदली बामरा येथे तहसीलदार म्हणून झाली.