CJI BR Gavai on how he secured third rank despite not attending College : भारताचे सरन्यायाधीश बीआर गवई यांनी गोव्यातील एका एका कार्यक्रमात बोलताना त्यांच्या विद्यार्थी जिवनातील काही प्रसंग सांगितले आहेत. यावेळी त्यांनी अनेक तरुण वकिलांना वरिष्ठांकडून मिळणारे मानधन (stipend) हे अत्यंत तुटपुंजे असल्याचे म्हटले आहे आणि त्यामुळेच त्या तरुण वकिलांना या व्यवसायात टिकून राहणे कठीण होते ही बाब देखील त्यांनी अधोरेखित केली. सरन्यायाधीश गवई हे गोव्यातील व्ही.एम. साळगावकर लॉ कॉलेजच्या सुवर्णमहोत्सवी समारंभात बोलत होते. यावेळी त्यांनीकनिष्ठांचे कल्याण ही बार असोसिएशनची प्राथमिकता असली पाहिजे यावर देखील भर दिला.

सरन्यायाधीश नेमकं काय म्हणाले?

“तरुण वकिलांच्या समस्या या कायमच माझ्या हृदयाच्या जवळच्या राहिल्या आहेत. वरिष्ठ वकिलांनी खुल्या मनाने कनिष्ठ वकिलांच्या कल्याणासाठी हातभार लावला पाहिजे. काही वरिष्ठ वकिलांकडून तरूण वकिलांना दिले जाणारे मानधन खूपच तुटपुंजे असून त्यांच्यासाठी टिकून राहणे कठीण आहे,” असे सीजेआय गवई म्हणाले. यावेळी त्यांनी औपचारिक शैक्षणिक कामगिरी ही भविष्यातील यशाची हमी देत नाही, असेही अधोरेखित केले.

पुढे बोलताना सरन्यायाधीश गवई यांनी मुंबईच्या सरकारी लॉ कॉलेजमध्ये आणि नंतर अमरावती येथे शिक्षण घेत असतानाचा त्यांचा अनुभव देखील यावेळी सांगितला. “जेव्हा मी मुंबईच्या सरकारी लॉ कॉलेजमध्ये होतो, तेव्हा आम्ही कंपाउंडच्या भिंतीवर बसायचो आणि आमची हजेरी लावणाऱ्या आमच्या मित्रांवर विसंबून असायचो. नंतर शेवटच्या वर्षात आम्ही अमरावतीला शिफ्ट झालो आणि तेथे मी कॉलेजला अवघे सहा वेळा गेलो असेन. माझा एक मित्र, जो पुढे उच्च न्यायालयाचा न्यायाधीश झाला तो तेव्हा माझी हजेरी लावत असे. निकाल जाहीर झाला तेव्हा मी कॉलेजात न जाता, पाच वर्षांचे सोडवलेले पेपर वाचून गुणवत्ता यादीत तिसरा आलो होतो,” अशी आठवण सरन्यायाधीश भूषण गवयी यांनी सांगितली.

एखाद्यामधील गुणवत्ता मोजण्यासाठी त्याच्या परीक्षांच्या निकालांना फार महत्त्व दिले जाऊ नये असेही सीजेआय गवई म्हणाले. यावेळी त्यांनी त्यांच्याबरोबरच्या अनेकांनी रँकिंग चांगली असूनही वेगवेगळे मार्ग निवडले असेही त्यांनी नमूद केले.

“जो विद्यार्थी गुणवत्ता यादीत पहिल्या क्रमांकावर आला होता तो जामिनामध्ये स्पेशलायजेशन करून क्रिमिनल लॉयर बनला बनला. नंतर दुसऱ्या क्रमांकावरील न्यायमूर्ती व्ही. एल. आचालिया हे जिल्हा न्यायाधीश नंतर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले आणि मी तिसऱ्या क्रमांकावर होतो, जो एक वकील बनलो आणि त्यानंतर सरन्यायाधीश झालो. त्यामुळे परीक्षेत तुमची रँक काय आहे याची काळजी करू नका. परीक्षेचे निकाल तुम्ही कोणते यश मिळवणार हे निश्चित करत नाहीत. तुमचा दृढनिश्चय, समर्पण, कठोर परिश्रम आणि व्यवसायाप्रति असलेली निष्ठा हेच महत्त्वाचे आहे,” असे सरन्यायाधीश गवई म्हणाले.