पुट्टपर्ती (आंध्र प्रदेश) : आपण घेतलेले निर्णय चांगले आहेत काय, तसेच त्यांची काही वाईट वैशिष्टय़े आहेत काय, याचे राज्यकर्त्यांनी दररोज सिंहावलोकन करायला हवे, असे मत सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांनी सोमवारी व्यक्त केले.

राज्यकर्त्यांचे १४ वाईट गुण असून त्यांनी ते टाळावेत, असे न्या. रमण यांनी महाभारत व रामायण यांचा दाखला देऊन सांगितले. पुट्टपर्ती येथील श्री सत्य साई इन्स्टिटय़ूट ऑफ हायर लर्निग या संस्थेच्या ४०व्या पदवीदान समारंभात ते बोलत होते.

‘लोकशाही व्यवस्थेतील सर्व राज्यकर्त्यांनी आपले दैनंदिन काम सुरू करण्यापूर्वी आपल्यात काही अवगुण आहेत का, याचे आत्मपरीक्षण करावे. न्याय प्रशासन देण्याची गरज असून ते लोकांच्या गरजेनुसार असावे. येथे अनेक ज्ञानी लोक असून, जगात व देशात चाललेल्या घडामोडी तुम्ही पाहात आहात,’ असे सरन्यायाधीश म्हणाले.

लोकशाहीत लोक हेच खरे मालक असून, सरकार जे निर्णय घेईल ते त्यांच्या फायद्याचे असायला हवेत, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

देशातील सर्व यंत्रणा स्वतंत्र व प्रामाणिक असाव्यात आणि त्यांचा हेतू लोकांची सेवा करण्याचा असवा. दुर्दैवाने आधुनिक शिक्षण व्यवस्था केवळ उपयुक्ततावादी कार्यावर भर देत असून, अशी व्यवस्था विद्यार्थ्यांचे चारित्र्य घडवणाऱ्या शिक्षणाच्या नैतिक किंवा आध्यात्मिक पैलू हाताळण्यास सक्षम नाही, असेही सरन्यायाधीशांनी सांगितले.