एपी, पॅरामाउंट

अमेरिकेत बेकायदा स्थलांतरितांच्या घरावर छापे घातल्यानंतर लॉस एंजेलिसमधील पॅरामाउंट येथे सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध संघर्षाचा भडका उडाला असून, निदर्शनाला हिंसक वळण मिळाले आहे. राज्यपाल गॅविन न्यूसॉम यांच्या आक्षेपाला डावलून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘कॅलिफोर्निया नॅशनल गार्ड’च्या सैनिकांना परिस्थिती हाताळण्यासाठी तैनात केले आहे.

कागदपत्रे नसलेल्या बेकायदा स्थलांतरितांना अमेरिकेत सरकारकडून लक्ष्य केले जात आहे. स्थलांतरित विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरात विविध विभागांत शंभरहून अधिक जणांना अटक केल्यानंतर या ठिकाणी असंतोषाचे वातावरण होते. सरकारी कर्मचारी गृहसुरक्षा विभागाजवळ असताना निदर्शक या ठिकाणी आले आणि संघर्ष उडाला. गेल्या दोन दिवसांपासून या ठिकाणी संघर्ष सुरू आहे. निदर्शकांनी कारही पेटवून दिल्याची घटना घडली आहे. निदर्शकांनी गस्तीच्या पथकांवर दगडफेक केली. त्यांच्यावर अश्रुधुरांचा मारा करण्यात आला.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ‘व्हाइट हाऊस’ने सैनिक तैनात करण्याची घोषणा केली आहे. असे करून ट्रम्प या ठिकाणी तणाव वाढवत असल्याचे राज्यपाल न्यूसॉम यांनी म्हटले आहे. सरकारी कृतींना हिंसेने उत्तर देऊन त्यांना आयती संधी देऊ नका, असे आवाहन राज्यपालांनी केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संरक्षणमंत्री हेगसेट यांनी नजीकच्या नौसैनिकांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. हिंसा सुरूच राहिली, तर त्यांना पाचारण केले जाईल, असे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले आहे.