हरियाणा येथील मिलेनियम सिटी गुरुग्रामच्या सेक्टर ४८ मध्ये शनिवारी रात्री एक थरारक घटना घडली. दोन अल्पवयीन मुलांनी त्यांच्याच वर्गमित्रावर गोळी झाडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलाला गोळी लागी आहे. तातडीने पोलीस तिथे पोहचले आणि मुलाला मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याची प्रकृती नाजूक असल्याची माहिती समोर आलली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन एक पिस्तुल, दोन मॅगझिन आणि ७० जिवंत काडतुसं ताब्यात घेतली आहे. हे पिस्तुल मुलाच्या वडिलांचं परवाना असलेलं पिस्तुल आहे अशीही माहिती पोलिसांनी दिली.
जखमी झालेल्या मुलाच्या आईने काय सांगितलं?
जखमी झालेल्या मुलाच्या आईने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्यांचा मुलगा ११ वीमध्ये शिकतो. शनिवारी संध्याकाळी त्याचे दोन मित्र आले त्यांनी त्याला खेडकी दौला या ठिकाणी बोलवलं. या ठिकाणी सेक्टर ४८ मध्ये त्यांनी एक घर भाड्याने घेतलं होतं. तिथे तिघांचं खाणं-पिणं झालं आणि त्यानंतर त्याच्या वर्गमित्राने त्याच्यावर वडिलांच्या पिस्तुलातून गोळी झाडली. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी काय सांगितलं?
पोलिसांनी या घटनेनंतर काही तासांतच दोन अल्पवयीन आरोपींना अटक केली आहे. प्राथमिक चौकशीत ही माहिती समोर आली आहे की तिघेही एकाच कॉलेजमध्ये आहेत. दोन महिन्यापूर्वी या तिघांमध्ये वाद झाला होता. त्या वादाचा राग मनात ठेवून या मुलावर गोळी झाडण्यात आली. गुरुग्रामच्या उच्चभ्रू सोसायटीत हे तिघेही राहतात. तिथे राहणाऱ्या प्रॉपर्टी डिलरच्या मुलाने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलीस मुलाच्या वडिलांवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवत कारवाई करण्याची शक्यता आहे. पोलीस आता या प्रकरणी नेमकं असं काय घडलं की दोघांनी मिळून त्या मुलावर गोळी चालवली? याचा शोध घेत आहेत.
