Class 9 student delivers baby in school toilet in Karnataka : कर्नाटकातील शहापूर तालुक्यातील एका सरकारी निवासी शाळेतील १७ वर्षीय विद्यार्थिनीने संस्थेच्या शौचालयात बाळाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.
आठवड्याच्या सुरूवातीला समोर आलेल्या या घटनेत शाळेच्या वेळेतच या नववीच्या विद्यार्थिनीला प्रसूतीकळा सुरू झाल्या. तिच्या वर्गातील मैत्रिणींना तिला वेदना होत असल्याचे दिसून आले त्यानंतर त्यांनी शाळेच्या प्रशासनाला याबद्दल माहिती दिली. त्यानंतर शाळेतील कर्मचाऱ्यांनी अल्पवयीन मुलगी आणि तिच्या नवजात बाळाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
दाखल झालेल्या एफआयआरनुसार मुलीचे वय १७ वर्ष आणि सात महिने इतके असून ती फूल-टर्म प्रेग्नंट होती आणि तिच्यावर ९ महिन्यांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार झाले होते.ही मुलगी शाळेच्या वसतीगृहात राहत होती.
सुरुवातीला ही मुलगी अधिक माहिती देण्यास टाळाटाळ करत होती. तिने दावा केला की तिला वॉशरुममध्ये असताना पोटात जोरात दुखू लागले आणि अनपेक्षितपणे तिने बाळाला जन्म दिला.
२८ वर्षीय पुरुषाला अटक
चौकशीनंतर या प्रकरणात एका २८ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. याच व्यक्तीची आरोपी म्हणून देखील ओळख पटली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की बरी झाल्यानंतर आणि डॉक्टरांनी तंदरुस्त असल्याचे सांगितल्यानंतर मुलीला समुपदेशन दिले जाईल. जेणेकरून काय घडले आणि ती आरोपीला ओळखत होती का याचा शोध घेता येईल.
दरम्यान जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात बाल लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण(POCSO) कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांच्या आखारावर आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच हॉस्टेल वॉर्डन, शाळेचे मुख्याध्यापक, स्टाफ नर्स आणि पीडितेचा भाऊ यांच्यासह इतर चार जणांवर देखील प्रशासनाला मुलीच्या गर्भवती असण्याबाबत माहिती न दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती शाळेच्या प्रशासनाने किंवा पीडितेच्या भावानेही तात्काळ पोलिसांना दिली नाही, असेही पोलिसांनी सांगितले. पीडितेच्या भावाला या घटनेबाबत तात्काळ माहिती देण्यात आली होती.