Jammu Kashmir Cloudbrust: जम्मू-काश्मीरमध्ये मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या आणि ढगफुटीच्या घटना घडत असल्याची माहिती समोर येत आहे. आता जम्मू-काश्मीरमधील रामबनमध्ये ढगफुटीची घटना घडली आहे. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

रामबनमध्ये झालेल्या ढगफुटीच्या घटनेमुळे अचानक आलेल्या पूरपरिस्थितीमुळे ३ जणांचा मृत्यू झाला आणि ४ जण बेपत्ता झाले आहेत. या संदर्भातील माहिती काही अधिकाऱ्यांनी दिली आहे. अधिकाऱ्यांच्या मते राजगड परिसरातील उंच भागात मुसळधार पाऊस आणि ढगफुटी झाली. त्यामुळे अचानक पूर आला आणि त्यामध्ये काही घरे वाहून गेले आणि अनेक घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. वाहत्या पाण्यामध्ये काही इमारती पूर्ण वाहून गेल्या. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

दरम्यान, या घटनेत बेपत्ता झालेल्या लोकांना शोधण्यासाठी स्थानिक प्रशासनाने काही पथके स्थापन केले आहेत. तसेच या घटनेत बाधित झालेल्या रहिवाशांना मदत करण्यासाठी बचाव आणि मदत कार्य स्थानिक प्रशासनाकडून सुरू आहे. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक नद्या पूर्णपणे भरून वाहत आहेत.

ढगफुटी म्हणजे काय?

ढगफुटी म्हणजे अकस्मात, कुठलीही पूर्वसूचना न देता तात्पुरत्या काळासाठी कोसळणारा मुसळधार पाऊस. ढगफुटीमध्ये सर्वत्र पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. ही घटना पर्वतीय भागात जास्त आढळते पण सपाट मैदानी प्रदेशसुद्धा आता त्यास अपवाद राहिलेले नाहीत. ही एक पावसाळय़ात घडणारी असाधारण नैसर्गिक घटना आहे. काही मिनिटांत अनेक मिलिमीटर पाऊस कोसळतो.

ढगफुटी ही स्थानिक भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असते. जेव्हा नैसर्गिक पद्धतीने पाऊस पडू लागतो तेव्हा जमिनीच्या पृष्ठभागावर तयार झालेली गरम हवा या थेंबांना खाली पडू न देता, त्यांचे बाष्प करून परत ढगाकडे पाठवते. ढगामध्ये हे बाष्परूपी थेंब आणि मूळचे थेंब यांची गर्दी होते, या थेंबाच्या एकत्रीकरणामुळे त्यांचा आकार मोठा होतो, ढगात अब्जावधी थेंबांची गर्दी होते त्यामुळे ढगाचे आकारमान, घनता आणि वजन वाढते अशा वेळी खालून वर आलेली उष्ण हवा जी या ढगांना तोलून ठेवत असते ती विरळ होऊ लागते आणि पाण्याने भरलेले हे ढग वेगाने खाली येऊ लागतात, त्यांचे आपआपसात घर्षण वाढते. त्यामुळे गडगडाट होऊ लागतो, विजा चमकू लागतात आणि एका विशिष्ट क्षणी ढग फुटून प्रचंड मोठय़ा पावसास सुरुवात होते. या पावसाचे थेंब आकाराने मोठे असतात आणि त्यांचा खाली येण्याचा वेग ८० ते ९० किलोमीटर एवढा असू शकतो.पर्वतीय भागात असे बाष्प थेंबांनी थबथबलेले ढग लहान-मोठय़ा शिखरांना धडकतात आणि ढगफुटी होते.