Cloudburst : उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील छेनागाड हे गाव डोंगराच्या आणि नदीच्या सान्निध्यात वसलेलं शांत आणि रम्य गाव होतं. या गावातले गावकरी हे शेती आणि पशुपालन करुन आपला उदरनिर्वाह करत होते. मात्र पाऊस आणि ढगफुटीनंतर हे गाव आणि चामोली गाव गायब झालं आहे. या ठिकाणी घरं दिसेनाशी झाली आहेत. फक्त पाऊस आणि ढगफुटीमुळे तयार झालेला ओला ढिगारा दिसून येतो आहे. या ढिगाऱ्याखाली अनेक कुटुंबं अडकल्याची भीती आहे. या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. मात्र पावसामुळे त्यातही अडचणी येत आहेत.
२८ ऑगस्टला ढगफुटी झाली आणि होत्याचं नव्हतं
२८ ऑगस्टला रुद्रप्रयाग या जिल्हातील छेनागाड या ठिकाणी इतका पाऊस झाला की गावच ढिगाऱ्याखाली दबलं गेलं आहे. चमोली जिल्ह्यातही ढगफुटी झाली. या ढगफुटीला हिमालयीन त्सुनामीही म्हटलं जातं आहे. या ठिकाणी एक हसतं खेळतं गाव होतं, सुखाने राहणारे लोक होते. पण एका पावसात सगळं होत्याचं नव्हतं झालं आहे. रुद्रप्रयागचे पोलीस अधीक्षक प्रल्हाद कोंडे यांनी सांगितलं की केदारनाथ हायवे बंद करण्यात आला आहे. छेनागाड या ठिकाणी ढगफुटी झाल्याने काही लोक बेपत्ता आहेत. ज्यापैकी काही जण नेपाळी वंशाचेही आहेत. या ठिकाणी मदत आणि बचावकार्य करणारी पथकं पोहचू शकलेली नाहीत कारण कारण महामार्ग बंद आहे. एसडीआरएफचं पथक चालत या ठिकाणी पोहचलं आहे. पण पाऊस भरपूर असल्याने बचावकार्यात खूप अडचणी येत आहेत.
छेनागाड हे गाव रुद्रप्रयाग जिल्ह्यातलं छोटं गाव
छेनागाड हे गाव रुद्रप्रयाग जिल्ह्यातील एक छोटं गाव होतं. हिमालयाच्या कुशीत वसलेलं गाव आता ढगफुटीत हरवलं आहे. या ठिकाणी असलेली हवा शुद्ध आणि ताजी असायची. आता गावच होतं की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. या गावातल्या लोकांना अलकनंदा आणि मंदाकिनी नद्यांचं पाणी मिळत होतं. शिवाय शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय होता. गहू आणि भाज्यांचं उत्पादन या गावातले शेतकरी करत होते. रुद्रप्रयाग आणि चमोली जिल्ह्यांत ढगफुटी झाली आहे.
चमोली जिल्ह्याची स्थिती काय?
चमोली जिल्ह्याचे दंडाधिकारी संदीप तिवारी यांनी सांगितलं की ढगफुटीमुळे चमोली जिल्ह्यातील दोन लोक बेपत्ता झाले आहेत. तसंच अनेक पाळीव प्राणी आणि पाळीव जनावरंही बेपत्ता झाली आहेत. या भागांमध्ये इतका पाऊस आणि ढगफुटी झाली की रस्ते बंद झाले. त्यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. तसंच अलकनंदा आणि मंदाकिनी या नद्यांच्या पाणी पातळीतही ढगफुटी आणि पावसामुळे प्रचंड वाढ होते आहे. रुद्रप्रयाग पोलिसांनी लोकांना गरज असेल तरच घराबाहेर पडा आणि पाऊस ज्या भागांमध्ये जास्त आहे तिथून दुसरीकडे स्थलांतरित व्हा असं आवाहन केलं आहे.