दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री उशिरा ईडीकडून अटक करण्यात आली. अरविंद केजरीवाल यांना अटकपूर्व जामीन देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर ईडीने तत्काळ कारवाई करून त्यांना अटक केली. दरम्यान, आज या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. सुनावणी पूर्ण झाली असून कोर्टाने निर्णय राखून ठेवला आहे.

सक्तवसुली संचलनालयाने दिल्लीतील मद्य गैरव्यवहारप्रकरणी गुरुवारी रात्री आम आदमी पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. लोकसभा निडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्रीपदावर असताना अटक करण्यात आलेले केजरीवाल हे पहिलेच नेते आहेत.

अटकेपासून संरक्षण देण्याची केजरीवाल यांची याचिका दिल्ली उच्च न्यायायलायने फेटाळून लावल्यानंतर गुरुवारी ईडीच्या पथकाने केजरीवाल यांच्या निवासस्थानाची झडती घेतली आणि रात्री त्यांना अटक केली. त्यांना आज शुक्रवारी न्यायालयापुढे हजर करण्यात आले. ईडीने यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या दहा दिवसांच्या कोठडीची मागणी केली आहे.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत केजरीवाल यांना झालेली अटक हा आपला बसलेला सर्वांत मोठा धक्का आहे. त्यांच्या अटकेमुळे भाजपाला शह देण्याच्या इंडिया आघाडीच्या प्रयत्नांनाही धक्का बसला आहे.गेल्याच महिन्यांत झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात अटक करण्यात आली होती.

दिल्लीतील मद्य गैरव्यवहारप्रकरणी चौकशीसाठी ईडीने आतापर्यंत अनेकदा केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, त्यांनी हजर राहण्या नकार दिला होता. मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांना मुख्य आरोपी ठरवण्यात आले असून हे दोघेही अबकारी शुल्क धोरण ठरवताना केजरीवाल यांच्या संपर्कात होते, असा ईडीचा दावा आहे.